तरुण रक्तालाही दुष्काळाने हरवले
By Admin | Updated: December 1, 2014 03:08 IST2014-12-01T03:08:37+5:302014-12-01T03:08:37+5:30
पस्तिशी म्हणजे कुठल्याही संकटाशी चार हात करण्याचे वय. सलग दोन वर्षे निसर्गाने अवकृपा केली. तरीही नव्या जोमाने यंदा हाती तिफण पकडली.

तरुण रक्तालाही दुष्काळाने हरवले
औरंगाबाद : पस्तिशी म्हणजे कुठल्याही संकटाशी चार हात करण्याचे वय. सलग दोन वर्षे निसर्गाने अवकृपा केली. तरीही नव्या जोमाने यंदा हाती तिफण पकडली. पुन्हा निसर्गाने दगा दिला. शेतात घातलेला खर्चही निघाला नाही. आता कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाला कसे जगवायचे, या चिंतेत मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. पस्तिशीतील या शेतकऱ्यांना दुष्काळाने हरवले.
तुळशीदास नारायण मंदलवाड (३२) याने रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंगाला विजेच्या मोटारीची वायर गुंडाळून स्टार्टरचे बटन दाबले आणि एका क्षणात स्वत:ला संपविले. काकांडी परिसरात त्याची तीन एकर जमीन आहे़ यंदा कमी पाऊस झाल्याने हाती काहीही लागले नाही. त्याचा पत्नी, चार मुली, आई आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. वसमत (जि. हिंगोली) तालुक्याच्या भेंडेगाव येथील ३५वर्षीय नामदेव संभाजी व्यवहारे याने यंदा खरीप हंगामात सोयाबीन व कापसाची लागवड केली होती. मात्र अत्यल्प पावसामुळे दोन्ही पिके हातातून गेली. त्यात २ लाखांचे कर्ज असल्याने त्याच्या विवंचनेतून शनिवारी रात्री पूर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वेसमोर उडी घेऊन नामदेवने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
वैजापूर (औरंगाबाद) तालुक्यातील शिऊर येथील जगन रामराव पागरे (३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. त्याची चार एकर शेती आहे. दुष्काळामुळे काहीच पिकले नाही. यामुळेच त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)- संबंधित वृत्त / ६
> औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी मराठवाड्यातील चार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. रविवारी यात आणखी तिघांची भर पडली.