तरुणाईला वेध ‘युवा’चे..!
By Admin | Updated: August 3, 2016 02:34 IST2016-08-03T02:34:58+5:302016-08-03T02:34:58+5:30
युवा महोत्सवाची चाहूल लागल्यावर प्रत्येक महाविद्यालयात तालमी-सरावाची सुरुवात होते.

तरुणाईला वेध ‘युवा’चे..!
रामेश्वर जगदाळे,
मुंबई- युवा महोत्सवाची चाहूल लागल्यावर प्रत्येक महाविद्यालयात तालमी-सरावाची सुरुवात होते. मग एकमेकांत
ठसन असणाऱ्या कॉलेजांमध्ये तर रात्रंदिवस ‘युवा’चा सराव केला जातो. यंदाच्या महोत्सवासाठीही ‘सैराट’ तरुणाईने कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. विद्यापीठाने जरा उशिरा वेळापत्रक जाहीर केले असले तरी व्हॉट्स अॅप, फेसबुकवर ‘युवा’ची जोरदार चर्चा रंगते आहे. या तालमीचा हा लाइव्ह रिपोर्ट...
>साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले
यंदा महाविद्यालयाने सर्व स्पर्धांत सहभाग घेतला आहे. मराठी व हिंदी एकांकिका, संगीत, समूह नृत्य याची जोरदार तयारी सुरू आहे. मागील वर्षी छायाचित्रण स्पर्धेत विजय मिळवला होता. या वर्षीही छायाचित्रण स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी एकांकिकेत थोड्याशा गुणांमुळे विजय हुकल्याने यंदा कंबर कसून जोरदार तयारी सुरू असल्याचे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.
जय हिंद
महाविद्यालय, चर्चगेट
तयारीला थोडा उशीर झाला असला तरी दिवस-रात्र मेहनत घेऊन युवा महोत्सवाची तयारी करीत आहोत. मागील वर्षापर्यंत महाविद्यालय जास्त स्पर्धांत भाग घेत नसे, पण यंदा विद्यार्थ्यांचा उत्साह व मेहनत पाहून जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे युवा महोत्सव विभाग प्रमुख कांचन भाववुंशे यांनी दिली.
श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय, बोरीवली
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयात युवा महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. सर्व स्पर्धांची जोरदार तयारी सुरू आहे. मागील वर्षी मराठी एकांकिका सादर करताना मिठीबाई महाविद्यालय व साठ्ये महाविद्यालय यांच्याबरोबर ‘काटे की टक्कर’ झाली होती. त्यामुळे जास्त भर एकांकिकेवर देण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांत सहभाग घेतला आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक विद्या नाईक यांनी दिली.