‘तरुणांनी वाचन वाढवावे’

By Admin | Updated: June 30, 2016 02:32 IST2016-06-30T02:32:25+5:302016-06-30T02:32:25+5:30

तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे.

'Young people should increase their reading' | ‘तरुणांनी वाचन वाढवावे’

‘तरुणांनी वाचन वाढवावे’

सागर नेवरेकर,

मुंबई- तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे. वाचनाने ज्ञानात भर पडत असल्याने तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. मात्र तंत्रज्ञान युगात तरुणपिढीचे वाचन कमी झाले आहे, अशी खंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. निमित्त होते ते साठ्ये महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेचे.
विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात २७ ते २९ जून दरम्यान बीएमएम मराठी विभाग पुरस्कृत ‘दर्पण मिडीया क्लब’ आणि ‘साहित्य रसग्रहण क्लब’ने व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे अभिनेते रमेश भाटकर आणि लाईफ कोच लीना परांजपे यांनी संवाद साधला.
प्रदीप निफाडकर म्हणाले, वाचन हे खुप महत्वाचे आहे. वाचनाने कवी घडतो. गझलेसाठी वाचन महत्त्वाचे असते. तरुणांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.
रमेश भाटकर म्हणाले, तरुणाईला समाजातील वास्तवाचे भान असावे. वाचनाला बंधन नसावे, जे मिळेल ते वाचत गेले पाहिजे. कोणत्या वयात काय वाचावे हे माहीत नसेल तर जाणकारांचा सल्ला घ्यावा. मराठी माध्यमातील मुलांनी इंग्रजी पुस्तकेही वाचली पाहिजेत. मराठी मुले इतर भाषांमध्ये मागे राहता कामा नयेत.
लीना परांजपे म्हणाल्या, मुलांनी कुठल्याही भाषेची भीती बाळगता कामा नये. मुलांनी कोणती पुस्तके वाचली, त्यातून ते काय शिकले आणि त्या गोष्टी किती अमलात आणल्या, हे एकमेकांशी शेअर केले पाहिजे. जे क्षेत्र आपल्याला आवडते त्या क्षेत्रातील वाचन जरुर करावे. प्रेरणादायी पुस्तके वाचावीत. वाचन करताना संयम ठेवला पाहिजे. मुलांनी प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी चांगले नसल्यास त्यांच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Young people should increase their reading'