दलित अत्याचारांविरोधात तरुणांचा ‘आक्रोश’
By Admin | Updated: May 21, 2014 03:28 IST2014-05-21T03:28:18+5:302014-05-21T03:28:18+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात झालेल्या नितीन आगे या दलित युवकाच्या हत्येविरोधात तरुण व विद्यार्थ्यांच्या संघटनांनी मंगळवारी आक्रोश व्यक्त केला

दलित अत्याचारांविरोधात तरुणांचा ‘आक्रोश’
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात झालेल्या नितीन आगे या दलित युवकाच्या हत्येविरोधात तरुण व विद्यार्थ्यांच्या संघटनांनी मंगळवारी आक्रोश व्यक्त केला. दलित अत्याचार विरोधी कृतीसमितीच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी दादर पश्चिमेकडून चैत्यभूमीवर धडक मोर्चा काढला. दादर पश्चिमेकडील हनुमान मंदिराकडून दुपारी चारच्या सुमारास टिळक ब्रिजवरून निघालेल्या मोर्चाचे चैत्यभूमीवर येताच सभेत रूपांतर झाले. या वेळी मोर्चात सामील झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा भावे म्हणाल्या, आगे हत्या प्रकरणाचा खटला अॅट्रॉसिटी अॅक्टखाली जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. यात विखुरलेल्या दलित संघटनांमुळे अत्याचारांविरोधात तीव्रतेने आवाज उठवला जात नाही. मात्र तरुणांमधील अस्वस्थता वाढत आहे. दलित पँथरची निर्मितीही अशाच परिस्थितीत झाल्याचे सरकारने विसरता कामा नये, असा सूचक इशाराही भावे यांनी दिला. कृती समितीचे सदस्य अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अत्याचार पीडित कुटुंबांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. साक्षीदारांच्या जिवाला धोका असल्याने प्रमुख साक्षीदारांच्या साक्ष अहमदनगर जिल्ह्याऐवजी दुसर्या जिल्हा न्यायालयात किंवा इन कॅमेरा घ्याव्यात. शिवाय समाजकल्याण खात्यामार्फत पीडिताचा खटला लढण्यासाठी सरकारी वकीलही नेमावा. पीडितांच्या पुनर्वसनासाठी सरकारने पीडित कुटुंबाला योग्य मदत द्यावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)