तुम्हाला बघून घेतो...
By Admin | Updated: August 26, 2014 04:14 IST2014-08-26T04:14:26+5:302014-08-26T04:14:26+5:30
२१ आॅगस्ट रोजी आरोपी आणि भाजप कार्यकर्ता परीक्षित धुमे याच्याविरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती.

तुम्हाला बघून घेतो...
मुंबई : २१ आॅगस्ट रोजी आरोपी आणि भाजप कार्यकर्ता परीक्षित धुमे याच्याविरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती. तेव्हा किरीट सोमय्या यांनी धुमेच्या मोबाईलवर फोन केला आणि पोलीस निरीक्षक संपत मुंढेंना द्यायला सांगितला. मुंढे फोनवर आले तेव्हा ‘धुमेला पोलीस ठाण्यात का बोलावले़?’ असा प्रश्न विचारुन सोमय्यांनी त्यांना मोठमोठ्याने दमदाटी केली. मुंढे यांनी तक्रारीत हा घडलेला सगळा प्रकार सविस्तर नमूद केला.
साडेतीनच्या सुमारास सोमय्या ५ ते ६ कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात आले. आत येताच ते गुन्हे प्रकटीकरण कक्षात आले. तेव्हा मुंढे यांनी सोमय्यांना नमस्कार केला आणि काय सहकार्य करू, असे विचारले. तेव्हा सोमैयांनी त्यांच्या हातावर फटका मारला. मुंढेंना धक्का देऊन ते प्रकटीकरण कक्षात शिरले. सोमैयांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना या प्रकाराची व्हीडीओ शूटिंग करण्यास सांगितले. तसेच तुम्हाला बघून घेतो, अशी धमकीही दिली. सोमैया आरोपी धुमेला हाताला धरून पोलीस ठाण्याबाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा मुंढे, अन्य पोलीस अधिकारी त्यांच्या पाठी धावले. साहेब तुम्ही असे करू नका, अशी विनंती पोलिसांनी केली. तेव्हा सोमय्यांनी 'माझ्या कार्यकर्त्याला मला विचारल्याशिवाय बोलावलेच कसे', असा सवाल केला. 'तुमच्याकडे वॉरंट आहे का?' अशी विचारणा करून पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सोमय्या धुमेला घेऊन निघून गेले. माजी न्यायाधीश अनिल साखरे यांनी सांगितले, सोमय्यांकडून संसदेत हा गुन्हा घडला असता तर त्यांच्या अटकेसाठी लोकसभा सभापतींकडून परवानगीची आवश्यकता होती. तर सोमय्या खासदार असल्याने तपासानंतरच अटकेचा निर्णय घेतला जाईल, असे सरकारी वकील अॅड. मानकुंवर देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)