सीमेवर जवान शहीद होत असताना आपण गझलेचा आनंद घेऊ शकत नाही - आदित्य ठाकरे
By Admin | Updated: October 8, 2015 12:30 IST2015-10-08T12:06:19+5:302015-10-08T12:30:12+5:30
सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असताना, शेकडो जवान शहीद होत असताना आपण इथे गझलीचा आनंद घेऊ शकत नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सेनेच्या विरोधाचे समर्थन केले.

सीमेवर जवान शहीद होत असताना आपण गझलेचा आनंद घेऊ शकत नाही - आदित्य ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - ' आंतरराष्ट्रीय सीमेवर रोज होणा-या चकमकी, शस्त्रसंधीचे उल्लंघन यात शेकडो जवान शहीद होत असताना आपण इथे बसून गझल कार्यक्रमांचा आनंद घेणे योग्य नाही, असे सांगत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवेसेनेने गुलाम अलींच्या कार्यक्रमाला केलेल्या विरोधाचे समर्थन केले आहे. दरम्यान मुंबईनंतर आता गुलाम अली खान यांचा पुण्यात १० ऑक्टोबर रोजी होणार कार्यक्रमही रद्द झाला आहे.
गुलाम अली खान यांच्या गझला सर्वांनाच आवडतात. पण आपण जवानांप्रतीही थोडीशी संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकप्रिय गझलगायक गुलाम अली हे केवळ पाकिस्तानी नागरिक असल्यानेच शिवसेनेने त्यांच्या कार्यक्रमाला विरोध केल्याने अखेर आयोजकांनी तो कार्यक्रम रद्द केला असून याबद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेनेच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ' आमचा विरोध गुलाम अली खान यांना नसून पाकिस्तान व त्यांच्याकडून होणा-या हिंसेला अाहे' असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने भारतातील दहशतवाद संपवला पाहिजे. गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द करून आम्ही शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
गुलाम अली यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यास शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी विरोध दर्शविला होता. षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. सीमेवर पाकिस्तानकडून हल्ले केले जात असताना गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द केला नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू अशा इशारा सेनेने दिला होता, त्यानंतर आायोजकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले.
'गेल्या ४० वर्षांपासून मी संगीत क्षेत्रात आहे, पण याआधी असे कधीच घडले नव्हते, भारतात मला प्रत्येक वेळेस प्रेमच मिळाल्याची प्रतिक्रिया गुलाम अली यांनी दिली. हा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आपल्याला राग आला नाही मात्र खूप दु:ख झाले' असेही ते म्हणाले.