- मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास मनपाचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवास्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले आहे. काल समारोप आणि सत्कार, आज ईडीची कारवाई झाल्यामुळे वसईत व मनपा अधिकार्यांमध्ये खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नाशिक, वसई, विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. बहुसंख्य छापे हे पवार यांच्याशी संबंधित असणार्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत.
वसई विरार परिसरात मंगळवारी पहाटेपासून छापे सुरू असून त्याबाबत ईडीने कमालीची गुप्तता पाळली आहे. एकाच वेळी १२ ठिकाणी शोध मोहीम सुरू झाली आहे. या अधिकाऱ्याच्या निवासस्थानीही शोध मोहीम सुरू असून उशीरापर्यंत कारवाई सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.
अनिलकुमार पवार यांचा सोमवारी पालिकेत निरोप समारंभ पार पडला होता आणि दुसऱ्याच मंगळवारी त्यांच्यावर ही कारवाई झाली. अनिल कुमार पवार यांची ठाण्यात एसआरए विभागात बदली झाली आहे.