होय, मीच हत्या केली!
By Admin | Updated: September 4, 2015 01:29 IST2015-09-04T01:29:28+5:302015-09-04T01:29:28+5:30
होय, शीनाची हत्या मीच केली. मीच तिच्या हत्येसाठीचा कट आखला. मीच या हत्याकांडाची सूत्रधार आहे, अशी स्पष्ट कबुली अखेर इंद्राणी मुखर्जीने खार पोलिसांना दिली.

होय, मीच हत्या केली!
मुंबई : होय, शीनाची हत्या मीच केली. मीच तिच्या हत्येसाठीचा कट आखला. मीच या हत्याकांडाची सूत्रधार आहे, अशी स्पष्ट कबुली अखेर इंद्राणी मुखर्जीने खार पोलिसांना दिली. अटकेनंतर तब्बल ११ दिवस खुद्द पोलीस आयुक्त राकेश मारियांपासून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंद्राणीकडे कसून चौकशी केली होती. त्यात तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र काल पती पीटर मुखर्जी यांच्यासमोर केलेल्या चौकशीत इंद्राणीने अखेर तोंड उघडलेच.
शीनाची हत्या कशी करायची, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी व कुठे लावायची याचाही बेत इंद्राणीनेच आखला होता. हत्येआधी एका पार्टीसाठी पेणमधील फार्महाउसवर जाणे झाले. प्रवासात गागोदे खिंडीतील निर्जन जंगल नजरेस पडले. तिथेच शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला, असेही इंद्राणीने सांगितले.
२३ एप्रिल २०१२ रोजी दुसरा पती संजय खन्ना याच्या मदतीने इंद्राणीने गळा आवळून पोटची मुलगी असलेल्या शीनाची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांनी तिचा मृतदेह गागोदे खिंडीत जाळला व पुरला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून भाड्याने घेतलेल्या ओपेल कोर्सा या कारमध्ये मागील सीटवर शीनाचा मृतदेह मध्ये ठेवून इंद्राणी व संजय कडेला बसले. ही कार अन्य आरोपी श्याम राय चालवत होता.
इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यांच्याकडील चौकशीचा सिलसिला गुरूवारीही सुरू राहिला. बुधवारी खार पोलिसांनी पीटर यांची तब्बल १२ तास कसून चौकशी केली होती. काल व आज दोन्ही दिवस पोलिसांनी अनेकवेळा पीटर आणि इंद्राणी यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. या चौकशीतून बरीच धक्कादायक माहिती समोर आल्याचे कळते.
आयएनएक्स वाहिनी विकल्यानंतर मुखर्जी दाम्पत्याला बख्खळ पैसा मिळाला. हा पैसा त्यांनी नातेवाइकांच्या नावे अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवला होता. मुखर्जी दाम्पत्याने एक प्रॉडक्शन हाउस शीनाच्या नावे विकत घेतले होते.
या प्रॉडक्शन हाउसवर शीना हक्क सांगू लागली. त्यामुळे इंद्राणीने प्रॉडक्शन हाउस स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला.
शीनाने मालमत्तेवरला हक्क सोडला नाही, तर तिला रस्त्यातून हटविण्याशिवाय पर्याय नाही, असे इंद्राणीने पीटरला सांगितले. तेव्हा मला पैशांशी मतलब आहे. काय-कसे करायचे ते तू बघून घे, असा दम पीटरने दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली.
गुरुवारी पोलिसांनी शीनाच्या नावे प्रॉडक्शन हाउस विकत घेतले होते का, याबाबत पीटर यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्याचे समजते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीने चौकशीत उघड केलेल्या माहितीची पीटर यांच्याकडे शहानिशा करण्यात आली. दुसरे असे की पोलिसांच्या चौकशीचा रोख पीटर-इंद्राणी मुखर्जी यांच्या मालमत्तेवर होता.