होय... मुलगीच आमच्या ‘वंशाचा दिवा’

By Admin | Updated: October 27, 2014 00:01 IST2014-10-26T23:53:35+5:302014-10-27T00:01:21+5:30

पाच वर्षांतील चित्र : एकावर फुलस्टॉप; सकारात्मक बदल

Yes ... the girl is our 'lineage' | होय... मुलगीच आमच्या ‘वंशाचा दिवा’

होय... मुलगीच आमच्या ‘वंशाचा दिवा’


भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यात एक, दोन, तीन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे गेल्या पाच वर्षांत ३ हजार ७४३ जणी ‘वंशाचा दिवा’ बनल्या आहेत. ७७७ दाम्पत्यांनी एका मुलीवर फुलस्टॉप दिला. त्यामुळे मुलगाच वंशाचा दिवा आहे, अशी मानसिकता करून घेऊन ‘वर्षाला पाळणा हलवत’ राहण्याला आता ब्रेक लागत आहे. ‘वंशाचा दिवा’ म्हणून मुलीही ओळखल्या जाऊ लागल्या आहेत, हे यावरून स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाकडील गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास एक, दोन, तीन मुलींवरच शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षाला वाढते आहे.
कोल्हापूर हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सधन जिल्हा. दरडोई उत्पन्नात देशातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा समावेश आहे. देशातील सर्वांत कमी जन्मदर असलेले काही मोजकेच जिल्हे. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश होतो; कारण या जिल्ह्याचा जन्मदर ८३९ पर्यंत खाली घसरला होता. ही स्थिती मुख्यत: पन्हाळा तालुक्यात होती. समाजात अजूनही मुलगाच वंशाचा दिवा आहे, अशी व्यापक मानसिकता आहे. मृत्यूनंतरचा विधी करण्यासाठी मुलगाच हवा, अशीही भावना आहे. यामुळेच एक तरी मुलगा असावा, अशी बहुतांश आई-वडिलांची इच्छा असते. याच इच्छेपोटी सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात गर्भातच स्त्री-भ्रूण खुडले जाऊ लागले. आर्थिक सुबत्ता, प्रगत वैद्यकीय सुविधा या प्रमुख कारणांमुळे गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या करण्यात एकेकाळी महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे आघाडीवर होते. दर हजारी मुलांमागे मुलींची संख्या घटू लागली. सन १९९१ ते २००१ पर्यंत मुलींच्या संख्येत प्रचंड घट झाली. त्यामुळे मुले, मुली यांच्यातील प्रमाण व्यस्त आहे. सर्वसाधारणपणे पहिली मुलगी झाल्यानंतर ‘पहिली मुलगी आणि धनाची पेटी’ असा समज करून तिला आनंदाने स्वीकारले जाते. मात्र, दुसरा मुलगाच हवा, असा अट्टहास करून मुलगी झाल्यानंतर आई-वडिलांसह जवळचे नातेवाईक नाक मुरडतात, नाराज होतात. मुलासाठी गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या केली जाते.
गेल्या दोन-तीन वर्षांत सर्वच पातळ्यांवर जाणीवजागृती मोहीम राबविल्याने मुलींचा जन्मदर वाढतो आहे. मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे सरसकट गर्भचाचणी करून मुलीचा गर्भ काढून टाकण्यास आता त्या तयार नाहीत, असाही मानसिकतेत बदल होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोनोग्राफी केंद्रांना ‘सायलेंट आॅब्झर्व्हर’ बसविणे सक्तीचे केले. त्यामुळे सरसकट जी लिंगचाचणी होत होती, तिला लगाम बसला. त्याशिवाय अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते ग्रामसेवकांपर्यंत आणि राजकीय नेतृत्वापासून ते सामाजिक संस्थेपर्यंत सर्वांनीच एका सुरात ‘मुलगी वाचवा’चा गजर केला. स्वयंसेवी संस्थांनी काही डॉक्टरांविरुद्ध स्टिंग आॅपरेशन करून तक्रारी दाखल केल्या. गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. कायदेशीर कडक कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. त्यामुळे अलीकडे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढू लागले आहे. मुलगीही वंशाचा दिवा म्हणून स्वीकारण्याची मानसिकता वाढीस लागत आहे. काही जोडपी स्वत:हून एक मुलगी, दोन मुली, तीन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेत आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या मातांचे एकावर फुलस्टॉप देण्याला अधिक प्राधान्य दिसते. सन २००९-१० साली एका मुलीवर १०० जोडप्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली होती. हे प्रमाण सन २०१३-१४ साली २६९ झाले आहे. यावरून मुलीला वारस, वंशाचा दिवा म्हणून मान्यता दिली जात असल्याचे चित्र समोर येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात स्त्री-भ्रूणहत्या करण्याचे प्रमाण एकेकाळी अधिक असल्यामुळे मुलींची संख्या घटली होती. मुलगाच वंशाचा दिवा, असाही समज कारणीभूत आहे. मात्र, आता सकारात्मक बदल होत आहे. व्यापक आणि अपेक्षितपणे नसले तरी एक, दोन, तीन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षाला वाढते आहे. मुलगीलाही वंशाचा दिवा, वारस म्हणून स्वीकारणारा वर्ग तयार होत आहे.
- डॉ. योगेश साळे, अधिकारी,  --जिल्हा माता-बाल संगोपन, कोल्हापूर

आम्हाला दोन मुलीच आहेत. मुलीही वंशाचा दिवा असतात. त्यामुळे आम्ही दोन मुलींवरच शस्त्रक्रिया करून घेतली. मुलींना चांगले शिक्षण देत आहोत. कधीही मुलींना कमी लेखले नाही. अधिक प्रोत्साहन देत असतो.
- सौ. शीला जाधव,  -लाईन बझार, कोल्हापूर

मुलगा, मुलगी भेदभाव मानण्याचे काही कारण नाही. मुलीही विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी करीत आहेत. मुलीही वंशाचा दिवाच आहेत. आम्हाला एकच मुलगी आहे. एकाच मुलीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. मुलगाच हवा यासाठी अट्टहास धरू नये.  --- अनिल चौगुले, निसर्गमित्र, महालक्ष्मीनगर, कोल्हापूर

वर्षनिहाय मुलींवर शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यांची संख्या अशी
वर्षएकदोनतीन
२००९-१० १००३६२२०२
२०१०-११ १४८३०६२२५
२०११-१२ १२७५०७१७४
२०१२-१३ १३३५६८१५८
२०१३ मार्च २०१४   २६९३१२१५२

सरासरीपेक्षा महिलांच्या साक्षरतेत वाढ.
जननदर वाढण्यात हा देखील मुद्दा कारणीभूत.

२००१ २०११
२००१ ते २०११ या काळातील
महिलांची
साक्षरता 66.38
टक्क्यांनी मागील दशकाच्या तुलनेत वाढ 13.3%
टक्क्यांनी सरासरी वाढ. 10.29%

कोल्हापूरच्या शेजारचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे मुलींच्या जननदरात राज्यात पुढे आहेत. विदर्भातील आदिवासीबहुल व तुलनेत मागासलेले जिल्हे मुलींच्या जननदरात पुढे आहेत.

राज्यात मागे कोण...?
838 --मुंबई  --857 --मुंबई उपनगर---880 --ठाणे

राज्यात  भारी कोण...
1123 -रत्नागिरी
1037 -सिंधुदुर्ग
975 -     गडचिरोली
984 -भंडारा
996 -गोंदिया

Web Title: Yes ... the girl is our 'lineage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.