येळ्ळूर ग्रामस्थांचा पुन्हा मराठी बाणा !
By Admin | Updated: February 2, 2015 05:58 IST2015-02-02T04:35:42+5:302015-02-02T05:58:27+5:30
येळ्ळूर गावाच्या वेशीवरील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक काढल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीला सहा महिने उलटत नाही तोच ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ लिहिलेला भगवा ध्वज पुन्हा लावला आहे. येळ्ळूरमध्ये रविवारी झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामस्थांनी पुन्हा मराठी बाणा दाखविला.

येळ्ळूर ग्रामस्थांचा पुन्हा मराठी बाणा !
बेळगाव : येळ्ळूर गावाच्या वेशीवरील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक काढल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीला सहा महिने उलटत नाही तोच ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ लिहिलेला भगवा ध्वज पुन्हा लावला आहे.
येळ्ळूरमध्ये रविवारी झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ग्रामस्थांनी पुन्हा मराठी बाणा दाखविला. संमेलनात कर्नाटक पोलिसांच्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा. राज्यघटनेने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना देण्यात यावेत, आदी ठरावही केले.
साहित्यिक डॉ. मनोज तायडे (अमरावती) संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांची प्रकट मुलाखत झाली. सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. येळ्ळूर साहित्य समिती संघटनेचे अध्यक्ष परशराम मोटारचे यांनी ठराव मांडले. मनोज तायडे म्हणाले, मी मराठीचे उत्तर टोक अमरावतीतून आलो असून, मराठीचे दक्षिण टोक असलेल्या बेळगावात उभा आहे. जेथे मराठी भाषेसाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे लढा उभारला आहे. अनासपुरे म्हणाले की, नारायण संत यांची वनवास, झुंबर आदी पुस्तके वाचून महाविद्यालयापासून मी बेळगावच्या प्रेमात पडलो आहे. येळळूरवासीयांना माझे एकच सांगणे आहे की आता आहे तशीच एकी राखा. (प्रतिनिधी)