वाईचे जवान सूरज मोहिते शहीद
By Admin | Updated: March 21, 2015 00:19 IST2015-03-21T00:16:07+5:302015-03-21T00:19:46+5:30
पंधरा दिवसांपूर्वीच सुटीचा आनंद

वाईचे जवान सूरज मोहिते शहीद
वाई : येथील जवान सूरज सर्जेराव मोहिते (वय २४, रा़ अंबिकानगर सिद्धनाथवाडी वाई, मूळ रा. गणेशवाडी-सरताळे, ता. जावळी) हे जम्मू काश्मीरमधील कथुआ येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाले. या घटनेत भारताच्या दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली.सिद्धनाथवाडीतील सूरज मोहिते हे दोन वर्षांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या सहा महिन्यांपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर कर्तव्य बजावत होेते़ ते अविवाहित असून, त्यांचा मोठा भाऊ पोलीस दलात अलिबाग येथे कार्यरत आहे़ त्यांच्या मातोश्री उषा सर्जेराव मोहिते सिद्धनाथवाडी येथे वास्तव्यास आहेत. सूरज मोहिते हुतात्मा झाल्याची बातमी समजताच वाई शहरावर शोककळा पसरली़ त्यांच्यावर वाई येथील सिद्धनाथवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
पंधरा दिवसांपूर्वीच सुटीचा आनंद
सूरज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी सरताळे येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी किसन वीर महाविद्यालयात घेतले. महाविद्यालयात त्यांनी बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. राष्ट्रीय तसेच राज्यस्तर स्पर्धेत वीस पदके मिळविली़ देशसेवेचे त्यांचे स्वप्न असल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात ते भरती झाले. पंधरा दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते./ संसदेत पडसाद - वृत्त १०