यवतमाळ जि.प.चा पदभरती पेपर पुन्हा फुटला

By Admin | Updated: November 23, 2014 00:34 IST2014-11-23T00:34:02+5:302014-11-23T00:34:02+5:30

पेपरफूट प्रकरणाने राज्यभर गाजत असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेत आता परिचर पदाच्या परीक्षेचा पेपर शनिवारी परीक्षा केंद्रातून फुटला. प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला

Yavatmal ZP recruitment paper broke again | यवतमाळ जि.प.चा पदभरती पेपर पुन्हा फुटला

यवतमाळ जि.प.चा पदभरती पेपर पुन्हा फुटला

परिचर परीक्षा : प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविणारा ताब्यात
सतीश येटरे - यवतमाळ
पेपरफूट प्रकरणाने राज्यभर गाजत असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेत आता परिचर पदाच्या परीक्षेचा पेपर शनिवारी परीक्षा केंद्रातून फुटला. प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठविणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक विक्रीकर आयुक्तांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार उघड झाला असून संपूर्ण पदभरतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जिल्हा निवड समितीच्यावतीने जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांसाठी पदभरती घेतली जात आहे. शनिवारी दुपारी परिचरांच्या ४५ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला तब्बल १८ हजार १५३ उमेदवार प्रविष्ट झाले होते. यवतमाळ शहरातील तहसील चौकस्थित जिल्हा परिषद मुलींची शाळा (काटेबाईची शाळा) या परीक्षेचे केंद्र होते. तेथे पर्यवेक्षक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सांख्यिकी विस्तार अधिकारी विक्रम राऊत यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राऊत यांनी वर्ग खोलीत दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वितरण केले. मात्र त्यातील एका उमेदवाराची प्रश्नपत्रिकास्वत:कडे ठेवून घेतली. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास ही प्रश्नपत्रिका एका अज्ञात व्यक्तीद्वारे परीक्षा केंद्राबाहेर पाठविली.
तत्पूर्वी ही प्रश्नपत्रिका सोडवून देण्याची गळ विस्तार अधिकारी राऊत याने मोबाईलवरून येथील सहायक विक्रीकर आयुक्त जगदीश पांडे यांना घातली. त्यानंतर लगेच ती अज्ञात व्यक्ती दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पांडे यांच्याकडे आली.
पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, अशी विचारणा करीत सदर व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न पांडे यांनी केला. मात्र तो झटापटीत प्रश्नपत्रिका सोडून पळून गेला.
त्यानंतर पांडे यांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी विस्तार अधिकारी राऊत याला ताब्यात घेतले. पांडे यांच्या मोबाईलवर आलेला कॉल विस्तार अधिकारी राऊत यांचाच असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने राऊत याच्याकडून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, राऊत याच्या घराची झडती घेऊन मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या मोबाईलवरून केलेल्या कॉलची आणि व्हॉटस्अपची पडताळणी सायबर क्राईम शाखेमार्फत सुरू केली.
तूर्तास चौकशी सुरू असून गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती यवतमाळचे एसडीपीओ राहुल मदने यांनी ‘लोकमत’ला दिली.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदभरतीचा पेपर यापूर्वी औरंगाबाद येथे फुटल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले होते.
या प्रकरणानंतर पुन्हा जिल्हा परिषद पदभरतीचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Yavatmal ZP recruitment paper broke again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.