यवतमाळात भव्य स्टेडियम साकारणार
By Admin | Updated: November 10, 2014 01:03 IST2014-11-10T01:03:13+5:302014-11-10T01:03:13+5:30
यवतमाळातील खेळाडूंसाठी सुसज्ज असे कुठेही मैदान नाही. असलेल्या मैदानांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. यवतमाळातील खेळाडूंसाठी शासनाने ई वर्गाची जमीन उपलब्ध करून दिल्यास

यवतमाळात भव्य स्टेडियम साकारणार
विजय दर्डा यांची माहिती : ‘वायपीएल-२०१४’ चे शानदार उद्घाटन
यवतमाळ : यवतमाळातील खेळाडूंसाठी सुसज्ज असे कुठेही मैदान नाही. असलेल्या मैदानांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. यवतमाळातील खेळाडूंसाठी शासनाने ई वर्गाची जमीन उपलब्ध करून दिल्यास भव्य स्टेडियम साकारणार असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळ पब्लिक स्कूलच्यावतीने आयोजित येथील पोस्टल मैदानावर रविवारी ‘यवतमाळ प्रिमीअर लिग-२०१४’ च्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून खासदार विजय दर्डा बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी, वायपीएस शाळा समितीचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे मुख्य संयोजक किशोर दर्डा, वायपीएसचे प्राचार्य डॉ. जेकब दास, स्पर्धेचे मुख्य समन्वयक यश बोरुंदिया उपस्थित होते.
खासदार विजय दर्डा म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ प्रिमीअर लिग सारख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ऐतिहासिक पोस्टल मैदानावर प्रथमच होत आहे. ही स्पर्धा भविष्यात विदर्भ, राज्य व अन्य लिग स्पर्धेत नक्कीच समाविष्ठ होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पोस्टल मैदानाच्या आठवणी सांगताना श्रद्धेय बाबूजी, मी स्वत: आणि राजेंद्र दर्डा यांनी या मैदानावर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला, असे त्यांनी सांगितले. कोणते राष्ट्र किती महान आहे हे सिद्ध करण्यासाठी खेळ हे महत्वपूर्ण माध्यम आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशातील खेळाडू पदक जिंकून देशाचे नाव मोठे करीत असतात. परंतु दुर्दैवाने देशात खेळाच्या प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाही. तालुक्यात मैदानांची कमतरता आहे. शासनाच्या क्रीडा निधीतून योग्य सुविधा निर्माण केल्या जात नाही. क्रीडा क्षेत्रातील ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. शासनाने ई वर्गाची जमीन उपलब्ध करून दिल्यास खेळाडूंच्या सोईसाठी यवतमाळात फुटबॉल व क्रिकेटचे अत्याधुनिक स्टेडियम साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार भावना गवळी म्हणाल्या, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळसाठी केलेले कार्य वाखाणण्यासारखे आहे. तोच गौरवशाली वारसा दर्डा परिवार पुढे नेत असल्याचे सांगितले. वायपीएस शाळा समितीचे अध्यक्ष तथा स्पर्धेचे मुख्य संयोजक किशोर दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धा आयोजनामागची भूमिका विशद केली. यवतमाळचे पोस्टल मैदान पूर्वी खेळाडूंनी भरून रहायचे. यात खंड पडला. येथील क्रिकेटचे वातावरण हळूहळू कमी होत आहे. तसेच जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये चांगला क्रिकेट पटू दडला आहे. त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही. चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, क्रिकेटला चालना मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या मुलीच्या संघाने क्रीडा ज्योत पाहुण्यांच्या सुपूर्द केली. त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तसेच ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी खासदार विजय दर्डा व खासदार भावना गवळी यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर स्पर्धेत सहभागी बारा शाळांतील संघांनी शानदार पथसंचालनाद्वारे सलामी दिली. तसेच स्वागत गीत सचिन वालगुंजे व विशाल सेंदरकर यांच्या मार्गदर्शनात सादर करण्यात आले. त्यानंतर वायपीएसच्या विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य सादर केले. उद्घाटन सामना जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल आणि सेंट अलॉयसेस स्कूल यांच्यात झाला. या दोनही संघाच्या खेळाडूंची ओळख खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी यांनी करून घेतली. संचालन प्रा. अजय कोलारकर, आभार प्राचार्य डॉ. जेकब दास यांनी मानले. (प्रतिनिधी)