यवतमाळमध्ये निवडणुकीत राडा!
By Admin | Updated: October 16, 2014 04:58 IST2014-10-16T04:58:49+5:302014-10-16T04:58:49+5:30
विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचा-यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली

यवतमाळमध्ये निवडणुकीत राडा!
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान दोन ठिकाणी पोलिसांना मारहाण तर एका ठिकाणी मतदान कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली. घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथे गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी झाला. तर दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी मतदान केंद्रावर माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेने निवडणूक कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली.
घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी हे गाव आर्णी विधानसभा मतदारसंघात येते. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन या केंद्रावर पोहोचले. तेथे गर्दी हटविण्याचा प्रयत्न करत असताना महाजन यांचा धक्का लागल्याने शंभू मारजी दडांजे (४०) हा खाली पडून बेशुद्ध झाला. त्यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या दीपक संभाराव निकडे यांना महाजन यांनी मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे महाजन यांनी सिर्व्हीस रिव्हॉल्वर काढून लोकांवर ताणले. त्यामुळे ग्रामस्थांनी धक्काबुक्की करीत दगडफेक सुरू केली. ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत महाजन यांच्यासह पोलीस शिपाई जखमी झाला आहे़ दुसऱ्या घटनेत पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे मतदान केंद्रासमोरील गर्दी हटविण्याचा प्रयत्न करीत असताना संतप्त झालेल्या मतदारांनी सहायक पोलीस निरीक्षक बाळू संपती जाधवर यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने लोकांवर बंदुक रोखली. त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी केली.