यवतमाळचा राहुल देतो संगीताचे आॅनलाईन धडे

By Admin | Updated: June 20, 2014 01:01 IST2014-06-20T01:01:11+5:302014-06-20T01:01:11+5:30

एका वळणावर त्याचे आयुष्य पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा या कठीण प्रसंगी एका डॉक्टरने त्याच्या मनात जगण्याची नवी उमेद जागविली. संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची डोळस दृष्टी

Yavatmal gives Rahul the online lessons of music | यवतमाळचा राहुल देतो संगीताचे आॅनलाईन धडे

यवतमाळचा राहुल देतो संगीताचे आॅनलाईन धडे

डोळस प्रयत्न : भारतीय संगीत साता समुद्रापार
संतोष अरसोड - यवतमाळ
एका वळणावर त्याचे आयुष्य पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा या कठीण प्रसंगी एका डॉक्टरने त्याच्या मनात जगण्याची नवी उमेद जागविली. संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची डोळस दृष्टी त्याला लाभली. यवतमाळातून जगभरातील अनेकांना तो आॅनलाईन पद्धतीने संगीताचे धडे देत आहे. डोळसांनाही लाजवेल असे यश प्राप्त केलेल्या या तरुणाची कहाणी प्रेरणादायी आहे.
यवतमाळातील बांगरनगरातील राहुल प्रभाकर सातव या ३२ वर्षीय अंध तरुणाने संगीत क्षेत्रात आपले अनोखे कर्तृत्व सिद्ध केले आहे. सामान्यपणे जीवन जगत असताना दहावीत राहुलला अचानक अंधत्व आले. चेन्नई येथील शंकर नेत्रालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. नवी दृष्टी येईल, ही आशा मात्र या नेत्रालयात मावळली. येथील डॉ. लक्ष्मी महेश यांनी राहुलला आता दृष्टी येणार नाही, असे सांगितले तेव्हा आयुष्यात डोळ्यासाठी तो शेवटचाच रडला. स्वत:च्या पायावर उभे राहा, हा डॉ. लक्ष्मी महेश यांचा संदेश त्याने आपल्या मनावर कोरून घेतला.
राहुलला लहानपणापासून संगीताची आवड होती. आई मालती यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले होते. तर वडील प्रभाकरराव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत भजन म्हणायचे. हा वारसा घेऊन राहूलने आपल्या डोळ्यांना नवी दृष्टी दिली. यवतमाळातील प्रभाकर चेपे, माधव चेपे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. संगीत विशारद, अलंकार इथपर्यंत राहुलने धडक दिली. अमरावती येथील प्रा. कांबळे यांच्याकडे घरंदाज गायकीचे शिक्षण घेतले. यामुळे राहूलच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पडले. यवतमाळातच स्वरवैभव संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेकांना शास्त्रीय गायन, सुगम संगीत, हार्मोनियम, कॅसिओ व तबला वादनात त्याने प्रवीण केले.
२००९ मध्ये यवतमाळ येथील पंजाबराव देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी राहूलला गायनाची संधी मिळाली. राहुलचे गायन विद्यालयाचे संस्थापक तुषार सायंकार यांनी इंटरनेटच्या माध्यमातून अमेरिकेत ऐकले आणि यामुळे प्रभावित होऊन आॅनलाईन संगीताचे धडे देण्याची संकल्पना पुढे आली. तब्बल सहा महिने राहुलने सायंकार यांना आॅनलाईन संगीत शिकविले. २०१० मध्ये एक वेबसाईड लॉंच करण्यात आली.
या माध्यमातून विदेशातील अनेक विद्यार्थी राहुल याच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागले. शिकागो, कॅलिफोर्निया, लॉसएंजिल्स, कटार, जिद्दा, लंडन येथील विद्यार्थ्यांना राहुल आॅनलाईन शास्त्रीय संगीताचे धडे देत आहे.
अमेरिकेतील विद्यार्थ्यांना शनिवार, रविवारी, सौदीअरबमधील विद्यार्थ्यांना शुक्रवारी व युकेमधील विद्यार्थ्यांना बुधवार व मंगळवारी आॅनलाईन शास्त्रीय संगीत शिकविल्या जात आहे.
शास्त्रीय संगीताचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात, बुद्धीला चालना मिळते. यामुळे विदेशातील लोकंं शास्त्रीय संगीताकडे वळल्याचे राहुलने सांगितले. त्याला हायफाय कीडस् कार्पोरेशन अमेरिकेचे निमंत्रणसुद्धा प्राप्त झाले आहे. यामुळे भारतीय शास्त्रीय संगीताचा सुगंध साता समुद्रापार दरवळणार आहे.

Web Title: Yavatmal gives Rahul the online lessons of music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.