ज्येष्ठ राजकीय विश्लेषक यशवंत सुमंत यांचे निधन
By Admin | Updated: April 12, 2015 01:39 IST2015-04-12T01:39:28+5:302015-04-12T01:39:28+5:30
ज्येष्ठ सामाजिक व राजकीय विश्लेषक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत (वय ५९) यांचे शनिवारी पहाटे येथे निधन झाले.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक यशवंत सुमंत यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ सामाजिक व राजकीय विश्लेषक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत (वय ५९) यांचे शनिवारी पहाटे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.
डॉ. सुमंत अभ्यासू व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सुपरिचित होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे ते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातून ते सावरु शकले नाहीत. अखेर शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे,आमदार अॅड. जयदेव गायकवाड, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, रामनाथ चव्हाण, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर, नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे, युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी, कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमंत यांचा जन्म सोलापूर जिल्ह्णातील अक्कलकोट येथे ५ सप्टेंबर १९५५ रोजी जन्म झाला.त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल. तसेच पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी मॉर्डन महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि संज्ञापन व वृत्तपत्र विभागात प्राध्यापक म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थांच्या वतीने त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राज्य शासनाचा १९८९ चा ‘बेस्ट एडीट बुक आॅफ द इयर ’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. त्यांनी विविध पुस्तकांचे लेखन
केले असून ‘सिक्स्थ लोकसभा इलेक्शन इन महाराष्ट्रा :१९७७’ तसेच ‘पॉलिटिकल थॉट इन महाराष्ट्रा’ हे दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले. ‘इमर्जिंग पॅटर्नस् आॅफ लिडरशीप इन इंडीया’ या प्रकल्पावर सध्या ते काम करत होते. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. (प्रतिनिधी)