लेखक व नाटककार अशोक पाटोळे कालवश
By Admin | Updated: May 12, 2015 09:32 IST2015-05-12T09:32:13+5:302015-05-12T09:32:21+5:30
मी माझ्या मुलांचा, आई रिटायर होतेय अशा ह्रदयस्पर्शी नाटकांचे लेखक व प्रसिद्ध नाटककार अशोक पाटोळे यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.

लेखक व नाटककार अशोक पाटोळे कालवश
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - मी माझ्या मुलांचा, आई रिटायर होतेय अशा ह्रदयस्पर्शी नाटकांचे लेखक व प्रसिद्ध नाटककार अशोक पाटोळे यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.
श्यामची मम्मी, जाऊबाई जोरात व सध्या गाजत असलेले एक चावट संध्याकाळ अशा नाटकांचे लेखन अशोक पाटोळे यांनी केेले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हसरते, अधांतर या मालिकांचेही त्यांनी लेखन केले होते. याशिवाय सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कवितासंंग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. आज सकाळी मुंबईतील जसलोक रुग्णालयात पाटोळे यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणाने त्यांचे निधन झाले.
निधनानंतर अंत्यंस्कार न करता पार्थिवाचे देहदान करावे अशी अशोक पाटोळे यांची अंतिम इच्छा होती. यानुसार पाटोळे यांचे पार्थिव जसलोक रुग्णालयातून केईएम रुग्णालयात देहदानासाठी नेले जाईल. अशोक पाटोळे यांचे पुत्र रुपेश पाटोळे यांनी ही माहिती दिली.