गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून

By Admin | Updated: July 7, 2015 02:01 IST2015-07-07T02:01:44+5:302015-07-07T02:01:44+5:30

चारित्र्याच्या संशयावरून तीसवर्षीय पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्यानंतर पतीने बाहेर जाऊन विषप्राशन केले.

Wound blood on the throat by the ax | गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून

गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून

फलटण (जि. सातारा) : चारित्र्याच्या संशयावरून तीसवर्षीय पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्यानंतर पतीने बाहेर जाऊन विषप्राशन केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी मध्यरात्री फलटण तालुक्यातील खटकेवस्ती येथे हा प्रकार घडला. या छळप्रकरणी सासू, सासरा व दीराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खटकेवस्ती येथील महादेव माळाजी गायकवाड व सुनीता या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडणे होत होती. त्यांना बारा वर्षांची मुलगी व दहा वर्षांचा मुलगा आहे. मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहते. सततच्या त्रासाला कंटाळून सुनीता काही दिवस माहेरी राहिली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी पुन्हा ती पतीकडे आली होती.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महादेवने धारदार कुऱ्हाडीने गाढ झोपेत असलेल्या सुनीताच्या मानेवर घाव घालून खून केला. त्यानंतर महादेव तेथून पळून गेला. सकाळी साडेसहाच्या सुमारास सुनीता का उठली नाही, हे बघण्यासाठी तिची सासू कुपदी तेथे आली, तेव्हा सुनीता मृतावस्थेत आढळली. हा प्रकार पाहिल्यानंतर सासूने आरडाओरड करत नवरा व दुसऱ्या मुलाला याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली.
फलटण ग्रामीण पोलिसांनी बेपत्ता महादेवचा शोध घेतला. मात्र, त्याचा तपास लागला नाही. गावातच लपून बसलेला महादेव सायंकाळी चारला विषप्राशन करून अचानक घरी आला. तेथे उपस्थित पोलिसांनी त्याला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खूनप्रकरणी महादेव याच्यावर गुन्हा नोंदविला असून, जाचहाटप्रकरणी सासरा माळाजी, सासू कुपदी, दीर संजय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Wound blood on the throat by the ax