वरळीतल्या भीषण आगीवर नियंत्रण
By Admin | Updated: June 10, 2016 00:32 IST2016-06-10T00:32:46+5:302016-06-10T00:32:46+5:30
वरळी परिसरातील ईमोझेस मार्गावरील कांबळेनगर शेजारी असलेल्या झाडांना रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली.

वरळीतल्या भीषण आगीवर नियंत्रण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबईत आग लागण्याचं सत्र काही थांबताना दिसत नाही आहे. वरळी परिसरातील ईमोझेस मार्गावरील कांबळेनगर शेजारी असलेल्या झाडांना रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली.
या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र वेळीच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि चार फायर इंजिनच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र ही आग लावण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. वरळीतल्या कांबळेनगर शेजारी पालिकेचा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला मोकळा भूखंड असून, त्या भूखंडावरती दाट झाडी वाढलेली आहे.
या भूखंडाच्या शेजारीत कांबळेनगर ही लोकवस्ती आहे. या लोकवस्तीत जवळपास शेकडोंच्या संख्येनं झोपड्या आहेत. त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. पालिकेनं या भूखंडाची योग्य ती काळजी घ्यावी असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.