विश्वविजेत्यांनी उलगडली यशोगाथा

By Admin | Updated: November 18, 2014 01:09 IST2014-11-18T01:05:20+5:302014-11-18T01:09:22+5:30

‘ओजीक्यू’चा उपक्रम : मनोगतातून घातला कोल्हापुरकरांच्या काळजाला हात

World Wrestling Success Stories | विश्वविजेत्यांनी उलगडली यशोगाथा

विश्वविजेत्यांनी उलगडली यशोगाथा

कोल्हापूर : आॅलिम्पिकमध्ये पहिले कांस्यपदक पटकाविणारे कुस्तीवीर खाशाबा जाधव, कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्याची खासियत, आपण कसे घडलो, आणि कोणामुळे आपण गरुडझेप मारली अशा एक ना अनेक यशोगाथा सांगत आज, सोमवारी हीना सिंधू, राही सरनोबत, योगेश्वर दत्त, गगन नारंग, गीत सेठी या आॅलिम्पिक विजेत्या खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी कोल्हापूरच्या क्रीडारसिकांच्या काळजालाच हात घातला. येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टने (ओजीक्यू) हा योग कोल्हापूरकरांसाठी घडवून आणला.
या कार्यक्रमात योगेश्वर दत्त, हीना सिंधू, राही सरनोबत, तरुणदीप राय , गीत सेठी, वीरेन रासक्विन्हा, अपूर्वी चंदेला, श्वेता चौधरी, प्रकाश नंजप्पा, संजीव राजपूत, के. टी. इरफान, अन्नुराजसिंग, पूजा धारकर, देवेंद्रोसिंग, अतुनूदास, आॅलिम्पिकवीरांचा गौरव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी ओजीक्यूतर्फे भारताला चीनपेक्षा अधिक पदके मिळवून देणारे खेळाडू द्यावेत, अशी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ओजीक्यूचा को-फौंडर व माजी आॅलिम्पियन व भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रासक्विन्हा यांनी २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमधील किमान १२ पदके तर टोकिओ आॅलिम्पिकमध्ये १२ पेक्षा अधिक पदके व ५८ आॅलिम्पिकवीर तयार करण्याचा मानस व्यक्त केला.
बिलियर्डस व स्नूकर वर्ल्ड चॅम्पियन आणि ओजीक्यूचे संयोजक गीत सेठी म्हणाले, फौंडेशनतर्फे गगन नारंग, योगेश्वर दत्त यांसारखे दोन कोहिनूर हिरे आहेत; आम्ही धनुर्विद्या, बॉक्सिंग यांकडे जादा लक्ष देत आहोत. त्याचबरोबर कुस्तीसाठीही संशोधन आणि खेळाडूंना मानसिक व त्यांना होणाऱ्या खेळातील इजा यांचाही तत्काळ अत्यंत उच्च दर्जाचे उपचार आमच्यातर्फे केले जात आहेत.
कुस्तीगिरांना खुराक, तर शूटरना योग्य पिस्तूल व लागणारे साहित्य पुरवीत आहोत. याकरिता आम्हाला आर्थिक, मानसिक पाठबळाची गरज आहे. सध्या पुण्यातून गार्डियन यांनी हे पाठबळ दिले आहे. त्यात आपल्या कोल्हापुरातून आम्हाला पाठबळ मिळावे.
आॅलिम्पिकवीर शूटर गगन नारंग याने २००७ साली माझे आॅलिम्पिकमधील पदक हुकले. हरणारा खेळाडू असूनही मला दिलासा देणारे काम ओजीक्यूने केले. या मदतीने मी बँकॉक येथील जागतिक शूटिंगमध्ये ६०० पैकी ६०० गुण प्राप्त करून नवीन विक्रम नोंद केला.
आॅलिम्पिकवीर शूटर हीना सिंधू म्हणाली, वर्ल्ड रेकॉर्डनतर ओजीक्यूच माझी काळजी घेते आहे. मी कोल्हापूर येथे झालेला सत्कार माझ्यासाठी मोठा गौरव असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
आॅलिम्पिकवीर योगेश्वर दत्त याने आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची आठवण असल्याचे आवर्जून सांगितले. ओजीक्यू, पुणे
विभागाचे अध्यक्ष आणि गार्डियन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मनीष साबडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम
झाला.


कोल्हापूरकरांची भरभरून दाद
‘ओजीक्यू’च्या हाकेला कोल्हापूरकरांनी भरभरून दाद दिली. यामध्ये उद्योगपती संजय घोडावत यांनी अकरा लाखांचा, तर उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी पाच लाख, उत्तम जाधव, विशाल चोरडिया, ऋतुराज पोवार, झुंजार सरनोबत यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले.


दिमाखदार सोहळा
कोल्हापुरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आॅलिम्पिकवीर आल्याने क्रीडारसिकांना त्यांना जवळून पाहण्याचा योग आला. हा योग केवळ ओजीक्यू व गार्डियनतर्फे मिळाल्याची भावना अनेकांनी बोलून व्यक्त केली. याशिवाय कोल्हापुरातही मोठी क्रीडा परंपरा आहे, हे या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही आपल्या कोल्हापूरच्या भेटीत जवळून पाहिले.


आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टतर्फे (ओजीक्यू) व गार्डियन कॉर्पोरेशनतर्फे सोमवारी आॅलिम्पिकवीर योगेश्वर दत्त, हीना सिंधू, राही सरनोबत, तरुणदीप राय, गीत सेठी, वीरेन रासक्विन्हा, अपूर्वी चंदेला, श्वेता चौधरी, प्रकाश नंजप्पा, संजीव राजपूत, के. टी. इरफान, अन्नुराजसिंग, पूजा धारकर, देवेंद्रोसिंग, अतुनूदास यांचा गौरव श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. सोबत गार्डियन कॉर्पाेरेशनचे अध्यक्ष मनीष साबडे, बिलियर्ड विश्वविजेता गीत सेठी, माजी आॅलिम्पिकवीर राकेश खन्ना, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रासक्विन्हा, आदी उपस्थित होते.

‘रिओ’मध्ये आठ पदकांचे ध्येय
गीत सेठी : खेळातील राजकारणाशी देणे-घेणे नाही
कोल्हापूर : खेळातील राजकारणाबाबत आम्हाला काही देणे-घेणे नाही. चांगले खेळाडू निवडणे आणि त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देऊन विश्वविजेता बनविण्यासाठी आम्ही काम करत आहे. रिओ येथे होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये आठ पदके मिळविण्याचे आमचे ध्येय आहे, अशी माहिती आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (ओजिक्यू) चे संस्थापक गीत सेठी यांनी पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापुरातील विशेष कार्यक्रमासाठी ते आज, सोमवारी आले होते. सेठी म्हणाले, देशातील गुणवान खेळाडूंना आॅलिम्पिक पदकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याच्या उद्देशाने ‘ओजिक्यू’चा स्थापना झाली आहे. त्याचे फलित म्हणजे २०१२ मध्ये लंडन आॅलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सहा पदकांपैकी चार पदके ‘ओजिक्यू’ने साहाय्य केलेल्या खेळाडूंनी पटकाविली. त्यात गगन नारंग, विजयकुमार, सायना नेहवाल, मेरी कोम यांचा समावेश होता. उत्कृष्ट खेळाडूंचा शोध घेणे, त्यांच्यावर पैलू पाडणे हा आमचा उपक्रम आहे.
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व ओजिक्यू सीईओ वीरेन रासक्वीन्हा म्हणाले, खेळाडूंकडून पटकन रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये, त्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण, आहार त्याला दिला पाहिजे. यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. तेच देण्याचे काम आम्ही करतो. सध्या बॅडमिंटन, बॉक्सिंग, नेमबाजी, तिरंदाजी या खेळाडूंकडे जास्त लक्ष आहे. ‘ओजिक्यू’च्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष मनीष साबडे म्हणाले, फेब्रुवारी २०१४ मध्ये ओजिक्यूचे पुणे चॅप्टर सुरु झाली. त्याची व्याप्ती वाढत आहे. खेळाडू घडविण्यासाठी पुढे काम करत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: World Wrestling Success Stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.