विश्व साहित्य संमेलन होणार दक्षिण आफ्रिकेत?
By Admin | Updated: June 27, 2014 00:29 IST2014-06-27T00:29:52+5:302014-06-27T00:29:52+5:30
विश्व साहित्य संमेलनाबाबत घटनाबाह्यतेच्या मुद्यावर रण माजले. विरोध झाला आणि महामंडळाला टीकाही सहन करावी लागली. पण एखादे संमेलन यशस्वी करण्याची जिद्द कशी असावी, याचा आदर्श सध्या साहित्य महामंडळाने

विश्व साहित्य संमेलन होणार दक्षिण आफ्रिकेत?
अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत : अधिकृत निर्णय होणार १ जुलै रोजी
राजेश पाणूरकर - नागपूर
विश्व साहित्य संमेलनाबाबत घटनाबाह्यतेच्या मुद्यावर रण माजले. विरोध झाला आणि महामंडळाला टीकाही सहन करावी लागली. पण एखादे संमेलन यशस्वी करण्याची जिद्द कशी असावी, याचा आदर्श सध्या साहित्य महामंडळाने घातला आहे. घटनात्मक पेच असला आणि अद्याप घटना मंजूर होऊन आलेली नसली तरी यंदाचे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन दक्षिण आफ्रि केत आयोजित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक आहे.
पहिल्या विश्व साहित्य संमेलनापासून हे संमेलन सतत वादात अडकले आहे. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय महामंडळाने विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनात पडणे योग्य ठरणार नाही, असा एक विचार बोलला जातो आहे. पण अद्याप घटनादुरुस्ती मंजूर झालेली नसतानाही साहित्यिकांना आफ्रिकन सफारीचा आनंद देण्याची योजना महामंडळाने तयार केली. याबाबत साहित्यक्षेत्रातच उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. टोरॅन्टोच्या विश्व साहित्य संमेलनाच्यावेळी टोरॅन्टोवासीयांनी साहित्यिकांचा खर्च नाकारला. त्यात हे संमेलनच घटनाबाह्य असल्याचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांनी शासनाचा २५ लाख रुपयांचा निधी महामंडळाला परत मागितला. महामंडळाने तो परतही दिला.
विश्व मराठी संमेलनाला अडचण नाही
विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात यंदा कुठलीच अडचण नाही. घटनादुरुस्ती झालेली आहे. घटनादुरुस्ती केल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीत त्यावर कुणाचाही आक्षेप नसेल तर घटना मान्य असल्याचे समजण्यात येते. त्याप्रमाणे ही घटना मान्य केली गेली आहे. त्यामुळे विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी कुठलीही अडचण येणार नाही आणि शासनाचाही निधी प्राप्त होईल. याबाबत महामंडळाने संपूर्ण तयारी केली आहे.
- शुभदा फडणवीस, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ, सदस्य