आनंदी जगण्याचे तंत्र अनिताने उलगडले
By Admin | Updated: March 11, 2015 00:15 IST2015-03-10T21:41:57+5:302015-03-11T00:15:19+5:30
जिद्दीवर मात : गेली १८ वर्षे ‘ती’ खुर्चीवर बसून आहे...

आनंदी जगण्याचे तंत्र अनिताने उलगडले
रत्नागिरी : संकटाचा सामना करता आला, की आपले धाडसच आनंदी जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवते, असे आनंदी जीवनाचे तंत्र गेली १८ वर्षे खुर्चीवर काढलेल्या कणकवली कलमठ येथील अनिता साळगावकरहिने महिला दिनी आयोजित केलेल्या जाहीर प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उलगडून दाखवले.अनिताला सहाव्या वर्षी मेंदूज्वरामुळे अपंगत्त्व आले. मानेखालील शरीरच बधीर झाल्याने ती पहिलीनंतर शिक्षणच घेऊ शकली नाही. मात्र, तिने या जगावेगळ्या आजारावर मात करत कविता करू लागली आहे. तिचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा, तिची जिद्द समाजासमोर यावी, या उद्देशाने येथील रत्नागिरी टेस्टट्युब बेबी सेंटर आणि वीरश्री चॅरिटेबल ट्रस्टने महिला दिनाचे औचित्य साधून अनिता साळगावकर हिच्या जाहीर प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनिता हिच्या पाऊस, पंख, बाप, भ्रष्टाचार, निवडणूक आदी विषयांवरील कवितांचे सादरीकरण स्मिता आंगोळकर आणि दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी केले. अनिताची ही पहिलीच प्रकट मुलाखत होती. पण, तरीही ती आपल्या या प्रवासाबद्दल भरभरून बोलली. यावेळी अनिताच्या जगण्याच्या लढाईत तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या आईवडिलांनी तिच्या जीवनप्रवासाबद्दल सांगितले. तिच्या शिक्षिका विदीशा पालव यांनी तिला कविता करणे, एसएमएस वा फेसबुकचा वापर करणे आदी गोष्टी शिकवून तिला आयटी क्षेत्रात साक्षर केल्याचे सांगितले. यावेळी वीरश्री चॅटिटबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, रत्नागिरी टेस्टट्युब बेबी सेंटरच्या प्रमुख डॉ. तोरल शिंदे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता, माजी नगरसेविका शिल्पा पटवर्धन, विरश्री ट्रस्टच्या सचिव डॉ. निशिगंधा पोंक्षे आदी उपस्थित होते. हा ट्रस्ट अपंग मुलांच्या मदतीसाठी असून त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. डॉ. मेहता यांनी अनिताबरोबरच तिच्या आई - वडिलांचेही कौतुुक केले. शिल्पा पटवर्धन यांनी अनितावर एक सुरेख कविता सादर केली. लायन्स क्लबतर्फे अनिताच्या छायाचित्रांचे कॅलेंडर दत्तप्रसाद कुलकर्णी व प्रमोद खेडेकर यांनी भेट दिले. डॉ. रश्मी आठल्ये उपस्थित होत्या. सूत्रसंचालन यशश्री पुरोहित यांनी केले. (प्रतिनिधी)
कलमठच्या अनिताचे अनुभव ऐकून सारेच हेलावले.
अनिताला सहाव्या वर्षीच मेंदूज्वरामुळे आले अपंगत्व.
मानेखालील शरिरच बधीर झाल्याने पहिलीनंतर शिक्षणच घेऊ शकली नाही.