काम करतो; पण पाठपुरावा थांबवा!
By Admin | Updated: September 27, 2015 05:48 IST2015-09-27T05:48:18+5:302015-09-27T05:48:18+5:30
एखाद्या कामासाठी सर्वसामान्य नागरिक खेटे घालत राहतो आणि नोकरशहा प्रत्येक वेळी टोलवाटोलवी करीत राहतो; पण काम काही होत नाही.

काम करतो; पण पाठपुरावा थांबवा!
अतुल कुलकर्णी, मुंबई
एखाद्या कामासाठी सर्वसामान्य नागरिक खेटे घालत राहतो आणि नोकरशहा प्रत्येक वेळी टोलवाटोलवी करीत राहतो; पण काम काही होत नाही. अशा या टोलवाटोलवीच्या वृत्तीला चाप लावण्याचा जालीम उपाय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोधला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या सततच्या पाठपुराव्यामुळे कावलेले अधिकाऱ्यांवर ‘काम करतो, पण पाठपुरावा थांबवा,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी स्वत:सोबत सतत दोन पुस्तिका ठेवणे सुरु केले आहे. एक असते सोपविलेल्या कामांची आणि दुसरी असते कामाच्या पाठपुराव्याची ! या पुस्तिकांमधील पानांवर ९ रकाने आहेत. त्यात अनु. क्रमांक, कामाचे स्वरुप, शब्द दिल्याचा दिनांक आणि वेळ, कोणत्या कार्यक्रमात शब्द दिला, काम कोणी सांगितले होते त्याचे नाव आणि मोबाईल नंबर, कामाची जबाबदारी कोणाची, काम दिल्याचा दिनांक व वेळ, काम पूर्ण होण्याचा अपेक्षित दिनांक आणि काम पूर्ण झाल्याचा दिनांक, असे नमूद आहे. ही सगळी माहिती मुनगंटीवार स्वत:च लिहून ठेवतात.
उदाहरण द्यायचे झाले तर जालन्याचा रस्ता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आणि अभ्यासिका करण्याच्या कामाबाबात मुनगंटीवार यांनी २२ सप्टेंबर रोजी सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शब्द दिला होता. या कामाची जबाबदारी मुनगंटीवार यांनी कणसे या त्यांच्या पीएकडे त्याच दिवशी सायंकाळी सोपवली. हे काम ‘डिसेंबर २०१५मध्ये पूर्ण होईल’, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. काम पूर्ण झाले की मुनगंटीवार लाल रंगाच्या शाईने त्या कामाला गोल करतात.
औरंगाबादच्या आॅटोक्लस्टरला ५ कोटीची मागणी त्यांना ३ जुलै रोजी १२ वाजून ३४ मिनीटांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात राम भोगले यांनी केली. आणि ७ जुलै रोजी हे काम कणसे नावाच्या पीएकडे सोपवले गेले. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा चेक उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्याची नोंदही त्यांनी करून ठेवली आहे.
अर्थमंत्री म्हणून तुम्ही सगळ्या मंत्र्यांनी अशा नोंदी ठेवाव्यात असे सांगाल का? असे विचारल्यावर ते म्हणाले, माझे काम मी करतो. बाकीच्या मंत्र्यांचे मी काय सांगणार? सर्व शिक्षा अभियानाच्या कर्मचाऱ्यांना कायम करावे अशी मागणी ते आमदार असताना सातत्याने करीत होते. आता वित्तमंत्री झाल्यावर हे काम कोणाकडे सोपवले आहे याची नोंद आहे का, असे विचारल्यावर ते म्हणाले, पुढच्या वर्षी ते काम नक्की होणार...
वित्तमंत्र्यांनी आणखी एक नोंद प्रत्येक फाईलसोबत लावणे सुरू केले आहे. त्याचे नाव आहे ‘फोन पाठपुरावा शीट’. कोणत्या विषयासाठी, कोणत्या अधिकाऱ्याला, कोणत्या तारखेला व कोणत्या वेळी फोन केले, याची नोंद त्यात असते. एवढेच नव्हे तर, ज्याला फोन केला, त्याने काय सांगितले, त्याचीही नोंद त्यात होते. त्यानुसार पुढे कधी फोन करायचा याचा तपशील त्यावर असतो. त्यानुसार काम होईपर्यंत पुन्हा-पुन्हा फोन करण्याचे आदेशच त्यांनी त्यांच्या पीएना देऊन ठेवले आहेत. त्यामुळे काम करतो पण फोन आवरा असे म्हणण्याची पाळी अधिकाऱ्यांवर आली आहे असे म्हणतात.