कामगारांच्या मुलांना देणार संगणक प्रशिक्षण
By Admin | Updated: July 4, 2015 03:14 IST2015-07-04T03:14:22+5:302015-07-04T03:14:22+5:30
स्पर्धात्मक युगात टिकाव लागावा म्हणून कामगारांच्या पाल्यांना हायटेक करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कामगार पाल्यांना

कामगारांच्या मुलांना देणार संगणक प्रशिक्षण
चेतन ननावरे , मुंबई
स्पर्धात्मक युगात टिकाव लागावा म्हणून कामगारांच्या पाल्यांना हायटेक करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कामगार पाल्यांना स्पर्धा परीक्षा आणि संगणक प्रशिक्षण देण्याचे वर्ग लवकरच मंडळामार्फत सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील ३५ लाख कामगारांची मंडळाकडे नोंद आहे. त्यांच्याकडून मंडळाला निधीही मिळतो. परिणामी, कामगारांचा व कुटुंबाचा विकास करण्याची मंडळाची जबाबदारी आहे. त्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या दोन्ही उपक्रमांचा फायदा नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना होणार आहे. पाल्यांची निश्चित आकडेवारी मंडळाकडे नसल्याने तूर्तास तरी १८ गट कार्यालये व २ प्रकल्प कार्यालयांत हे उपक्रम सुरू करण्यात. या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्याची व्याप्ती कितपत वाढवायची, यावर निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, नामवंत व अनुभवी संगणक प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविले आहेत. लवकरच उपक्रमांची रुपरेषा ठरवण्यात येईल. संस्थांनी पाठवलेल्या प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतर मंडळ निर्णय घेणार आहे. सध्या ज्या संस्थांनी मंडळाला प्रस्ताव पाठवले, त्यांच्या प्रतिनिधींसोबत अभ्यासक्रमाची रुपरेषा, कालावधी अशा विविध बाबींवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांत प्रशिक्षण
मुंबई, रत्नागिरी, पुणे, लातूर, नांदेड, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ठराविक कामगार क्रीडा भवन, ललित कला भवन आणि कामगार कल्याण भवनमध्ये स्पर्धा परीक्षा आणि संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.