श्रमजीवीने रोखली अल्पवयीनांची लग्ने
By Admin | Updated: April 30, 2016 03:23 IST2016-04-30T03:23:45+5:302016-04-30T03:23:45+5:30
तालुक्यातील कुडूस येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता धनगर समाजातील ७ जोडप्यांची लग्ने होणार होती.

श्रमजीवीने रोखली अल्पवयीनांची लग्ने
वाडा : तालुक्यातील कुडूस येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता धनगर समाजातील ७ जोडप्यांची लग्ने होणार होती. मात्र यातील दोन जोडपी ही अल्पवयीन असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच ते पोलिसांसह लग्न स्थळी पोहचून त्यांनी ही लग्ने रोखली. हा प्रकार येथे जोरदारपणे चर्चीला जात आहे.
कुडूस गावाच्या हद्दीत धनगर समाजाच्या सात मुला मुलींची लग्ने शुक्रवारी सायंकाळी होणार होती. यासाठी गेल्या तीन दिवसां पासून जोरदार तयारी सुरू होती. मंडप टाकण्यात आले होते. डी जे ही वाजंत्री सुद्धा होती. नाशिक, अहमदनगर येथील पाहुणे मंडळी सुद्धा वधू वरांवर अक्षता टाकण्यासाठी हजर होते. या सात जोडप्यापैकी दोन जोडपी ही अल्पवयीन होती. शरद कोलपे (१९), अश्विनी हाके (१५) तसेच दत्ता हिरू मदणे (२०), सुधंराबाई कोलपे (१४) रा. ढवळपूरी अहमदनगर येथील रहिवासी असलेले वधूवर ही अल्पवयीन असल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा नेते उल्हास भानुशाली, तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, सरिता जाधव यांना समजताच त्यांनी थेट कुडूस पोलीस चौकी गाठली. येथील साहयक पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोईर, पोलीस नाईक एस. वाय. चौधरी यांना घेऊन लग्न स्थळी पोहचले. तेथे वधू वरांच्या जन्म तारखा बघितल्यावर दोन जोडपी ही अल्पवयीन असल्याचे त्यांच्या पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनीही ही दोन लग्ने न लावता उर्वरित लग्ने लावण्याचा निर्णय घेतला. श्रमजीवी संघटनेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. (वार्ताहर)