इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: July 4, 2016 01:17 IST2016-07-04T01:17:14+5:302016-07-04T01:17:14+5:30
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला

इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वारज्यातील ईशान्य सृष्टी सोसायटीमध्ये घडली. पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजू विश्वास शिंदे (वय ३८, रा. शिवकल्याण मित्रमंडळाजवळ, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रीतम सुरेश साकरे (वय ३८, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार मार्तंड डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. वारज्यातील ईशान्य सृष्टी सोसायटीचे बांधकाम सुरू आहे. या साईटवर शिंदे यांना साकरे यांनी प्लंबिंगच्या कामावर ठेवले होते. सातव्या मजल्यावर झोल्यावर बसून काम करीत असताना शिंदे यांचा तोल गेला. झोल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी साकरे यांनी कामगारांच्या जीविताबाबतीत हलगर्जीपणा दाखवला. त्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट तसेच सुरक्षा जाळी बसविली नाही. इमारतीच्या उघड्या डक्टवर जाळी बसविणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास उपनिरीक्षक एस. बी. ताथवडे करीत आहेत.