कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याचे काम महिन्याभरापासून अर्धवट

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30

कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेचे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे

The work of the road in the Kurla railway station area is half-a-month | कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याचे काम महिन्याभरापासून अर्धवट

कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याचे काम महिन्याभरापासून अर्धवट


मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेचे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून अर्धवट स्थितीतच असल्याने याचा मोठा त्रास प्रवाशांसह रिक्षाचालकांना सहन करावा लागत आहे. त्यातच या खोदकामामुळे वाहतूककोंडीत भर पडत असल्याने संबंधित कंत्राटदारावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये कुर्ला रेल्वे स्थानकाचा समावेश होतो. या स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते. कुर्ला पूर्वेकडील रिक्षा स्टँडजवळ गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. लगतच सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामामुळे तर हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला होता. त्यामुळे हा रस्ता पुन्हा नव्याने तयार करावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून रहिवासी करत होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र कंत्राटदाराने केवळ रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यातच या रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि रेतीदेखील रस्त्यामध्येच टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांना जाण्यासाठी मार्गच राहिलेला नाही. ज्या रस्त्यावर हे काम सुरू आहे, तो रस्ता रिक्षा स्टँडचा आहे. मात्र महिन्याभरापासून हे काम अर्धवट स्थितीत असल्याने रिक्षाचालक त्यांच्या रिक्षा या मुख्य रस्त्यावरच उभ्या करतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडीमध्ये वाढ झाली आहे. रेल्वे स्थानक गाठण्यासाठी नेहमीच प्रवाशांना घाई असते. अशात हे काम अर्धवट असल्याने चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पालिका अधिकाऱ्यांनी निदान अशा ठिकाणी तरी योग्य लक्ष घालून कामे वेळेवर संपवावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The work of the road in the Kurla railway station area is half-a-month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.