महिला सुरक्षा महत्त्वाची

By Admin | Updated: March 1, 2017 05:56 IST2017-03-01T05:56:31+5:302017-03-01T05:56:31+5:30

मुंबई उपनगरीय लोकलमधून दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात.

Women's security is important | महिला सुरक्षा महत्त्वाची

महिला सुरक्षा महत्त्वाची


मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यात २२ टक्के महिला प्रवासी असून, त्यांची सुरक्षा अधिक गरजेची आहे आणि त्यावर भरही दिला पाहिजे, असे मत वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तलिना जॉर्जिवा यांनी व्यक्त केले. जॉर्जिवा यांनी चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास दुसऱ्या श्रेणीच्या महिला डब्यातून केला. त्या वेळी जॉर्जिवा यांनी महिला प्रवासी तसेच पत्रकारांशीही संवाद साधला.
ख्रिस्तलिना जॉर्जिवा या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईतील विविध प्रकल्पांना वर्ल्ड बँकेकडून निधी दिला जातो. त्या कामाची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. यात एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचाही समावेश आहे. जॉर्जिवा यांनी सकाळी पावणे दहाच्या सुमारास चर्चगेट येथून प्रवासास सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी काही महिला प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना मिळणाऱ्या सुविधा, सुरक्षा याची माहितीही रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेतली. या वेळी त्यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेमध्ये सुधारणेचा आग्रहदेखील धरला.
जास्तीतजास्त आणि चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्थानकातील रोशणाईत सुधारणा करणे, ट्रेनमध्ये पोलिसांचे संख्याबळ वाढविणे इत्यादी उपाय केल्यावर महिला प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली. महिला प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असून, ती वाढविण्यावरही शासनाने भर दिला पाहिजे आणि त्याचा अधिकाधिक वापरही महिला प्रवाशांनी करायला हवा. त्यामुळे महिला प्रवाशांचा प्रवासही सुरक्षित होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठीही अधिक लक्ष आमच्याकडून दिले जाईल आणि त्यासाठी रेल्वेकडेही बोलणी करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
>महिलांची संख्या मोठी
लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या
ही मोठी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून दररोज एकूण १६ लाख महिला प्रवासी प्रवास करतात. यामध्ये ८ लाख ५८ हजार मध्य रेल्वेवरील तर ७ लाख ५0 हजार पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांचा समावेश आहे.
वर्ल्ड बँकेच्या सीईओ यांनी चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास करून महिला प्रवाशांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे एमयूटीपी-२ आणि एमयूटीपी-३ प्रकल्पांची कामे याबाबतची माहितीही त्यांना देण्यात आली.
- प्रभात सहाय (एमआरव्हीसी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)
एमआरव्हीसी आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्याकडून नुकतेच महिला प्रवाशांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी २५ टक्के महिला प्रवाशांंनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले होते.
वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तलिना जॉर्जिवा मुंबईभेटीवर आल्या आहेत. मंगळवारी त्यांनी लोकलने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

Web Title: Women's security is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.