महिला कार रॅली ५ मार्चला रंगणार
By Admin | Updated: March 2, 2017 02:38 IST2017-03-02T02:38:28+5:302017-03-02T02:38:28+5:30
महिला सबलीकरणाचा संदेश देत आगामी महिला दिनानिमित्त ५ मार्चला मुंबईत विशेष महिला कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला कार रॅली ५ मार्चला रंगणार
मुंबई : महिला सबलीकरणाचा संदेश देत आगामी महिला दिनानिमित्त ५ मार्चला मुंबईत विशेष महिला कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तिसऱ्या वर्षी रंगणाऱ्या या रॅलीमध्ये सुमारे ८०० ते १००० मुंबईकर महिला ड्रायव्हर्सचा सहभाग होणार आहे.
वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनच्या (डब्ल्यूआयएए) वतीने होत असलेली ही रॅली मुंबई विमानतळाजवळील एका नामांकीत हॉटेलपासून सकाळी ७ वाजता सुरु होईल. त्यानंतर, वरळी सी फेस, पेडर रोड, चौपाटी, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट अशा मार्गाने लोणावळा अॅम्बी व्हॅली येथे समाप्त होईल.
सोशल मिडियावर सध्या विविध प्रकारे महिला चालकांवर टीका होते. अनेकदा त्यांच्यावर विनोद तयार करुन महिलांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. परंतु, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, ड्रायव्हींग सारख्या पुरुषी क्षेत्रातही आम्ही आमचे वेगळे स्थान निर्माण करु शकतो, असा संदेश देत मुंबईतील महिलांनी गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वी केला आहे. यंदाच्या तिसऱ्या वर्षी या मोहिमेमध्ये १८ ते ७५ वयोगटातील महिला ड्रायव्हर्सचा सहभाग लाभला आहे.
बेला दंताना, अल्पा धकन आणि बिना शाह या तीन महिला ड्रायव्हर्स सलग तिसऱ्यांदा या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही पुर्ण तयारीनिशी महिलांना नवा आत्मविश्वास मिळवून देण्यास सज्ज असल्याचे, या तिन्ही ड्रायव्हर्सनी ‘लोकमत’ला सांगितले.
सुमारे २५० हून अधिक कारचा सहभाग या रॅलीमध्ये असून प्रत्येक कारमध्ये चार महिलांचा समावेश असेल. यामध्ये ड्रायव्हर, नेव्हीगेटर (मार्गदर्शक) आणि दोन सहकारी प्रवाशी असा एक संघ असेल. प्रत्येक संघाला निर्धारीत वेळेत रॅली पुर्ण करणे आवश्यक असेल. तसेच, प्रत्येक संघाला गणिती सुत्रांवर आधारीत रॅलीचा मार्ग आखून देण्यात आला असून हे सुत्र सोडविण्याची जबाबदारी सहकारी प्रवाशांवर असेल. तर, मिळालेल्या मार्गाची दिशा दाखवण्याची जबाबदारी नेव्हीगेटरवर असेल. (प्रतिनिधी)