लालबागमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
By Admin | Updated: September 6, 2016 20:49 IST2016-09-06T20:49:58+5:302016-09-06T20:49:58+5:30
लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.

लालबागमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी सागर मंगशे रहाटे (३०) विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक रेखा खजुरे या लालबागचा राजा येथे कर्तव्य बजावत होत्या. दुपारी एकच्या सुमारास त्याठिकाणी पोहचलेल्या सागर मंगशे रहाटे (३०) याने लालबागच्या प्रवेशद्वारातून जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी रहाटेला आत घुसण्यास विरोध केला.
रहाटे याने लालबाग राजा मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून महिला पोलिसाला दमदाटी करत धक्काबुक्की केली. या हल्ल्यात खजुरे जखमी झाल्या.
महिला पोलीस अधिकारी खजुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी आरोपी रहाटे विरोधा भादंवी कलम ३५३, ३३२ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रहाटे हा काळाचौकी परिसरातील गणेशनगर इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तो मंडळाचा कार्यकर्ता नाही
महिला पोलिसासोबत हुज्जत घालणारा अधिकारी आमचा कार्यकर्ता नाही. तो तेथील रहिवासी आहे. त्याच्याकडे रहिवासी पास नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बी. कांबळे यांनी दिली.