महिला डॉक्टरांचा रुग्णालयात विनयभंग
By Admin | Updated: November 18, 2014 15:06 IST2014-11-18T02:26:31+5:302014-11-18T15:06:05+5:30
साईनाथ रुग्णालयात दोन महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा चार तरुणांनी विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.

महिला डॉक्टरांचा रुग्णालयात विनयभंग
शिर्डी (अहमदनगर) : साईनाथ रुग्णालयात दोन महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा चार तरुणांनी विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. टवाळखोरांच्या या प्रकाराने धास्तावलेल्या १० महिला डॉक्टरांनी प्रशिक्षण अर्धवट सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे. संस्थानातील या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. ११ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली़ पीडित महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर वसई-विरार (पालघर) भागातील असून, त्या सख्ख्या बहिणी आहेत. रविवारी त्यांनी ही घटना पालकांना सांगितली. त्यानंतर सोमवारी दुपारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आकाश कैलास रजपूत, किरण बोरडे, रोहित मगर यांना अटक केली आहे. सुरज शेजवळ याचा शोध सुरू आहे.
११ नोव्हेंबरला रात्री आरोपी तरुण साईनाथ रुग्णालयात आले़ त्यांनी या दोन प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांना अडवून, त्यांच्या अंगाशी खेटण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टर त्यांच्यापासून कशीबशी सुटका करून तातडीच्या उपचार कक्षात पोहोचल्या. तेथे त्यांनी निवासी डॉक्टरांना हा प्रकार सांगितला़ डॉक्टरांनी या तरुणांना विचारणा करताच त्यांनी डॉक्टरांनाही अर्वाच्य भाषेत धमकावले. सोमवारी तक्रार दाखल होताच येथील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या माहितीवरून आकाश रजपूत या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले़त्याला पीडित डॉक्टरांनी ओळखले. त्याने अन्य तिघांची नावेही सांगितली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)