महिलांमध्ये बळावतोय हृदयविकाराचा धोका
By Admin | Updated: September 29, 2014 07:38 IST2014-09-29T07:38:11+5:302014-09-29T07:38:11+5:30
हृदयविकार हा प्रामुख्याने पुरुषांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार असे समजले जात होते, मात्र गेल्या तीन वर्षांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले

महिलांमध्ये बळावतोय हृदयविकाराचा धोका
पूजा दामले, मुंबई
हृदयविकार हा प्रामुख्याने पुरुषांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार असे समजले जात होते, मात्र गेल्या तीन वर्षांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, ३५ वर्षांवरील महिलांनाही हृदयविकार होण्याचा धोका वाढलेला आहे. महिलांमध्ये हृदयविकार होण्याची कारणे त्यांच्या जीवनशैलीत असल्याचे दिसून आले आहे. भारतातील ५ पैकी ३ महिलांना हृदयविकाराचा धोका लवकरात लवकर म्हणजे वयाच्या ३५ वयापर्यंत निर्माण होताना दिसत आहे.
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील १२ प्रमुख महानगरे आणि नगरांपैकी १ लाख ६० हजार लोकांचा समावेश केला होता. यापैकी ३२ टक्के महिला होत्या. ३२ टक्के महिलांपैकी ९२ टक्के महिलांचे वय ६० पेक्षा कमी होते. शहरी भागातील ५१ हजार ७०० महिलांमधून ५ पैकी ३ महिलांना हृदयविकाराचा धोका असल्याचे सर्वेक्षणात आढळले.
अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका असण्याचे सर्वाधिक म्हणजे ७० टक्के इतके प्रमाण आहे. या महिलांमध्ये ५३ टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा, ५७ टक्के महिलांत चांगल्या कोलेस्ट्रॉलची कमतरता आढळून आली आहे.
भारतात ३५ ते ४४ वयोगटातील महिलांना हृदयविकार होण्याचा धोका जास्त आहे. महिलांमध्ये बैठी जीवनशैली, तणावपूर्ण कामाची स्थिती यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढताना दिसतो आहे. ३५ ते ४४ वयोगटातील महिलांना हृदयविकाराचा अधिक धोका आहे, यावर महिलांनी लक्ष दिले पाहिजे, असे एंडोक्रेनॉलॉजिस्ट प्रा. शशांक जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)