महिला अकाउंटंटने लावला १६ कोटींचा चुना!

By Admin | Updated: July 2, 2016 02:47 IST2016-07-02T02:47:29+5:302016-07-02T02:47:29+5:30

एका महिला अकाऊंटन्टने स्वत:च्या कंपनीला १६ कोटींचा चुना लावला असून तिने हे पैसे तिच्या नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केल्याचे प्रकरण उघडकीस आले

Women accountant has opted for Rs 16 crores! | महिला अकाउंटंटने लावला १६ कोटींचा चुना!

महिला अकाउंटंटने लावला १६ कोटींचा चुना!


मुंबई : एका महिला अकाऊंटन्टने स्वत:च्या कंपनीला १६ कोटींचा चुना लावला असून तिने हे पैसे तिच्या नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. परदेशवारी करण्यापूर्वीच महिला अकाऊंटन्टला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
डोंबिवलीतील वृषाली बामणे ही पती सचिन सोबत राहते. सात वर्षांपासून महालक्ष्मी ‘रोप वक्स’मध्ये ती अकाऊंटन्ट म्हणून नोकरीला लागली. कंपनीचे सारे आर्थिक व्यवहार हाताळत असताना तिची नजर फिरली. तिने हळूहळू कंपनीचे पैसे नातेवाईकांच्या खात्यात वळविण्यास सुरुवात केली. मे महिन्याच्या आॅडिट दरम्यान तिचा प्रताप उघडकीस झाला. तिने आठ वेगवेगळ््या खात्यांत हे पैसे वळविले होते. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली. तिने सर्वाधिक पैसा बंगला, फ्लॅट घेण्यात खर्च केल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी तिचे ८ बँक खातेही सील केली आहेत. बामणेच्या डोंबिवलीतील घरातून पोलिसांनी १८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे. वृषालीच्या नावे असलेले एक बँक लॉकर अजून उघडलेले नाही. त्यातून मोठे घबाड हाती लागेल, असा पोलिसांचा कयास आहे. या दाम्पत्याने ठाण्यातही काही मालमत्ता विकत घेतल्याची माहिती पुढे येत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Women accountant has opted for Rs 16 crores!