महिलेच्या पोटातून ३६ वर्षांनी बाहेर काढला गर्भाचा सांगाडा!
By Admin | Updated: August 20, 2014 01:01 IST2014-08-20T01:01:27+5:302014-08-20T01:01:27+5:30
येथील एका इस्पितळातील डॉक्टरांच्या तुकडीने ६० वर्षे वयाच्या एका महिलेवर अगदी विरळा म्हणता येईल अशी शस्त्रक्रिया करून गेली ३६ वर्षे तिच्या ओटीपोटात राहिलेला न जन्मलेल्या अर्भकाचा सांगाडा बाहेर काढला!

महिलेच्या पोटातून ३६ वर्षांनी बाहेर काढला गर्भाचा सांगाडा!
विरळी शस्त्रक्रिया : नागपूरच्या डॉक्टरांची कामगिरी
नागपूर : येथील एका इस्पितळातील डॉक्टरांच्या तुकडीने ६० वर्षे वयाच्या एका महिलेवर अगदी विरळा म्हणता येईल अशी शस्त्रक्रिया करून गेली ३६ वर्षे तिच्या ओटीपोटात राहिलेला न जन्मलेल्या अर्भकाचा सांगाडा बाहेर काढला!
ही अदभूत शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव कांताबाई गुणवंत ठाकरे असे असून ती मध्य प्रदेशातील पिपरिया (शिवणी) या गावातील आहे. बाह्यरुग्ण म्हणून उपचारासाठी आलेल्या कांताबाईवर येथील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस आणि लता मंगेशकर इस्पितळातील डॉक्टरांच्या चमुने गेल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया केली. डॉ. बी.एस. गेडाम यांनी या डॉक्टरी पथकाचे नेतृत्त्व केले. इस्पितळाच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. मुर्तझा अख्तर यांनी सांगितले की, कांताबार्इंना वयाच्या २४ व्या वर्षी सन १९७८ मध्ये गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली होती. या गर्भाची पूर्ण वाढ न होता तिचे गर्भारपण अर्ध्यावरच संपुष्टात आले होते. गेल्या ३६ वर्षांत तो गर्भ विरून जाऊन एका ढिसूळ पिशवीत अडकलेला त्याच्या हाडांचा सांगाडा फक्त शिल्लक राहिला होता. शस्त्रक्रिया केली असता गर्भाच्या हाडांचा हा सांगाडा कांताबार्इंचे गर्भाशय, आतडी व मूत्रपिंड यांच्या मधल्या जागेत अडकून या तिन्ही अवयवांना चिकटून बसला असल्याचे आढळून आले. यामुळेच गेले काही महिने या महिलेस ओटीपोटात वेदना होऊन लघवीच्या वेळी त्रास होत होता. कांताबार्इंचा एक बिजांडकोषही जागेवर नसल्याचे डॉक्टरांना आढळले.
गेले दोन महिने ओटीपोटात सतत वेदना होत असल्याची तक्रार घेऊन कांताबाई या इस्पितळात बाह्यरुग्ण म्हणून आल्या होत्या. तपासणी केली असता तिच्या ओटीपोटाच्या खालील बाजूस आतमध्ये कसला तरी गोळा असल्याचे जाणवले व कदाचित ती कर्करोगाची गाठ असावी, अशी डॉक्टरांना सुरुवातीस भीती होती. सोनोग्राफी केली असताही ओटीपोटातील अज्ञात गोळयाचे अस्तित्व नक्की झाले. सीटी स्कॅन केला असता हा हा गोळा कसल्यातरी कठीण पण ढिसूळ पदार्थाचा असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या १४ आॅगस्टला सुमारे चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर कांताबार्इंच्या ओटीपोटातून हाडाच्या सांगाड्याचे हे गाठोडे बाहेर काढले गेले व आता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)