दोघा चिमुकल्यांसह महिलेने घेतला गळफास
By Admin | Updated: January 1, 2017 17:28 IST2017-01-01T17:28:35+5:302017-01-01T17:28:35+5:30
दोन चिमुकल्यांसह महिलेने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण, ता. नंदुरबार येथे घडली.

दोघा चिमुकल्यांसह महिलेने घेतला गळफास
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 1 - दोन चिमुकल्यांसह महिलेने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण, ता. नंदुरबार येथे घडली. महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सिंदगव्हाण येथील शेतकरी मुरलीधर पाटील (३५) हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. सकाळी ते शेतात गेले असता आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी प्रतिभा (३०), खुशी (आठ वर्ष) व चेतन (सहा वर्ष) हे शेजारच्या लोकांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तातडीने तालुका पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
प्रतिभा यांच्या माहेरी ही घटना कळविण्यात आली. आई, वडील व इतर नातेवाईक आल्यावर त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. पती मुरलीधर हा नेहमीच तिच्यामागे पैशांसाठी तगादा लावत होता. शेतीसाठी वेळोवेळी पैसे देखील दिल्याचे मयत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुरलीधर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.