अर्ध्या जिल्ह्यात अवकाळीचा फेरा : वीज पडून महिला ठार; दोन जखमी

By Admin | Updated: May 8, 2017 02:27 IST2017-05-08T02:27:01+5:302017-05-08T02:27:01+5:30

रविवारी अर्ध्या जिल्ह्यात हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील इमानगाव येथे वीज पडून एक महिला ठार

Woman killed in electricity; Two injured | अर्ध्या जिल्ह्यात अवकाळीचा फेरा : वीज पडून महिला ठार; दोन जखमी

अर्ध्या जिल्ह्यात अवकाळीचा फेरा : वीज पडून महिला ठार; दोन जखमी

विजांच्या कडकडाटासह वादळी गारांच्या पावसाने रविवारी अर्ध्या जिल्ह्यात हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील इमानगाव येथे वीज पडून एक महिला ठार झाली. तर शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे वीज पडून दोघे जखमी झाले. तसेच बारामती, जुन्नर, खेड, पुरंदरच्याही काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. याचा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर/न्हावेर, शिरसगाव काटा : तालुक्यात अनेक गावांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. इनामगाव येथे वीज पडून एका ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर उरळगाव येथे दोघे जखमी झाले. शिरूर शहर परिसर तसेच करडे भागात गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे. शिरसगाव फाटा येथे एका शेतकऱ्याचा नव्याने बांधलेला गोठा पडला.
प्रचंड उष्णता व उष्णतेच्या दाहकतेमुळे सर्वत्रच लोक हैराण होते. आज दुपारी तीनच्यादरम्यान आकाश काळ्या ढगांनी दाटले. ४ च्यादरम्यान जोराचा वादळी वारा सुरू होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने शहरासह तालुक्यातील अनेक भागांत हजेरी लावली. अलका बबन थोरात (वय ४२, रा. इनामगाव) यांच्या अंगावर साडेचारच्यादरम्यान वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत पाच ते सहा महिलाही शेतात काम करीत होत्या. सुदैवाने त्या बचावल्या. त्यांनी आरडाओरड केली. मात्र थोरात यांचा मृत्यू झाला होता. उरळगाव फाट्यावर (न्हावरे-तळेगाव रस्ता) वादळी वारे सुटल्याने दत्तात्रय भुजबळ, अजित शेलार झाडाखाली उभे होते. त्यांच्या अंगावर वीज कोसळली. मात्र त्यातून ते दोघेही सुदैवाने बचावले. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. यात शेलार यांना आज घरी सोडण्यात आले. भुजबळ यांना उद्या घरी सोडले जाणार आहे.

शरसगाव फाटा येथे धनंजय कोळपे यांनी नुकताच नवीन बांधलेला गोठा वादळी वाऱ्यामुळे कोसळला. शिरूर शहर परिसरातही जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. करडे येथे एक तास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शिक्रापूर येथे आजचा बाजारचा दिवस होता. बाजाराच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उन्हापासून संरक्षणासाठी ताडपत्र्याचे छत बांधले होते. हे छत उडून गेले. शेतकऱ्यांची यामुळे खूप धावपळ झाली. पाबळ, केंदूर तसेच कान्हूरमेसाई भागात यादरम्यान तुरळक पाऊस झाला. कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली.


जिरायती भागात हजेरी; बागायती भाग कोरडाच
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शहरात रविवारी (दि. ७) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वाढत्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला. सायंकाळी पावसाने गारवा निर्माण झाला होता. या पावसाने जिरायती भागात तुरळक हजेरी लावली. बागायती भाग मात्र कोरडाच होता.
बारामती एमआयडीसीमध्ये गारांचे प्रमाण अधिक होते. सायंकाळी ५ वाजता अचानक वादळी वारे वाहू लागले. सुमारे १५ मिनिटे वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यानंतर वादळाची तीव्रता कमी झाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. आज झालेल्या पावसाने डाळिंब उत्पादकांची झोप उडाली आहे.
कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद अली यांनी सांगितले, की हा पाऊस डाळिंबपिकासाठी नुकसानकारक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी उन्हात वाळविण्यासाठी ठेवलेले धान्य संरक्षित ठेवावे. जनावरांचेदेखील वादळी वारे, पाऊस यापासून संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी.
बाबुर्डीसह लव्हेवस्ती, शेरेवाडी येथे पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. सुप्यात सायंकाळी ढग अचानक दाटून येऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पश्चिम भागातील मोरगाव परिसरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी पाचच्यादरम्यान मोरगाव, तरडोली, मुर्टी, लोणी भापकर, मासाळवाडी परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडला. सुरुवातीला पावसाचे मोठे टिपके सुरू झाले. मात्र, अल्पावधीतच जोर कमी झाला.

खेडमध्ये वळवाचा पाऊस
काळुस : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील काळुस, भोसे, रास, वडगाव, शेलगाव परिसरात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडल्या. चाकण-शिक्रापूर रस्त्याकडेस पाण्याची डबकी साचलेली दिसत होती.

सासवड परिसरात पावसाचा शिडकावा
सासवड : सासवड व परिसरात सायंकाळी ६ नंतर जोरदार वादळी वारे वाहिले. पावसाने मात्र गुंगारा दिला. पावसाचा फक्त शिडकावा झाला. दोन दिवस हवेत जास्त उष्णता होती. वादळी
वारे व विजांच्या कडकडाटाने जोरदार
पाऊस येईल, अशी अपेक्षा होती, मात्र पाऊस झाला नाही. पुरंदरमधील वीर -परिंचे भागात मात्र जोरदार पाऊस झाला.

दौंडला पावसाच्या हलक्या सरी
दौंड : शहरासह ग्रामीण भागातील काही
गावांत सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी पडल्या. दौंड शहरात अधूनमधून विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुटले होते, तर नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता. पाटस, राहू, केडगाव या भागात पावसाच्या सरी झाल्या.

जुन्नरच्या पूर्व भागात वादळी पाऊस
राजुरी : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने, तसेच पावसाने चांगले झोडपले. राजुरी, बेल्हा, आळेफाटा, आळे, वडगाव आनंद या गावांना सायंकाळी सहानंतर वादळी वारे तसेच पावसाने चांगले झोडपले. दरम्यान, आज दिवसभर या परिसरात चांगली उष्णता होती. दिवसभर कडक पडलेल्या उन्हामुळे
सायंकाळी आकाशात ढग भरून आले होते. जोराचा वारा सुटला होता. चारच दिवसांपूर्वीच या परिसरात जोराचे वादळ होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

नीरा परिसरातही हजेरी
नीरा : नीरा व परिसरातील गावांमध्ये जोराचा वारा व वादळी पावसाने हजेरी लावली. वळवाच्या या पावसाने परिसरात मोठा थंडावा निर्माण झाला आहे. नीरासह राख, कर्नलवाडी, गुळूंचे, पिंपरे खुर्द आदी परिसरातील गावांमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटात जोराच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या थोड्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. आज झालेल्या वादळी वाऱ्याने जनावरांच्या गोठ्यावरील तसेच जुन्या घरांवरील कौलारू छपरे उडाली. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Woman killed in electricity; Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.