नाशिकमध्ये महिलेचे अपहरण; देहविक्रयसाठी मुंबईला विक्री
By Admin | Updated: February 22, 2017 21:02 IST2017-02-22T20:57:23+5:302017-02-22T21:02:37+5:30
प्रेमविवाह केलेल्या बांगलादेशी पत्नीचे सिन्नर येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी दहा दिवसांपूर्वी अपहरण

नाशिकमध्ये महिलेचे अपहरण; देहविक्रयसाठी मुंबईला विक्री
नाशिक : प्रेमविवाह केलेल्या बांगलादेशी पत्नीचे सिन्नर येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी दहा दिवसांपूर्वी अपहरण करून तिची मुंबईला वेश्या व्यवसायासाठी विक्री केल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे केली असून, पत्नीची वेश्या व्यवसायातून सुटका करण्याची विनंती केली आहे़ या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे़
पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेची वडाळागावातील एका तरुणाशी ओळख झाली़ या ओळखीतून ती महिला त्यास बांगलादेशला घेऊन गेली़ तिथे त्याचा परिचय भावना (नाव बदलले आहे) नावाच्या मुलीशी झाला व ते दोघेही नाशिकला आले व त्यांनी प्रेमविवाह केला़ यानंतर गत सहा महिन्यांपासून हे वडाळागावात राहात होते़
सिन्नर येथील वेश्या व्यवसायाशी संबंधित एक महिला व तिची मावशी हे पाथर्डी फाटा येथील भावनाच्या घरी आले़ या दोघींनी एक दिवस मुक्काम करून भावनाचा पती कामावर गेल्याची संधी साधून तिला बळजबरीने सोबत घेऊन गेले़ तसेच जातांना भावना व तिच्या पतीच्या विवाहाची कागदपत्रे, आधार कार्डही सोबत घेऊन गेले़ याचदिवशी भावनाने पतीला कसाबसा फोन करून मला मुंबईला वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले असून मला वाचवा, असे सांगितले़
यानंतर भावनाचा पती सिन्नरला वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेकडे गेला असता त्यास मारहाण करून त्याची दुचाकीही काढून घेण्यात आली़ तसेच दलालीच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन भावनाची मुंबईला विक्री करण्यात आल्याचे सांगितले़ यानंतर भावनाच्या पतीने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही़ त्यामुळे नाईलाज झालेल्या भावनाच्या पतीने पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याकडे तक्रार केली आहे़