कल्याणमधील महिलेला स्वाइन फ्लू
By Admin | Updated: February 13, 2015 01:36 IST2015-02-13T01:36:05+5:302015-02-13T01:36:05+5:30
राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना कल्याण शहरातही या आजाराचा रुग्ण आढळला आहे. खडकपाडा परिसरात राहणा-या एका ४९ वर्षीय महिलेला याची लागण झाल्याचे निष्पन्न

कल्याणमधील महिलेला स्वाइन फ्लू
कल्याण : राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना कल्याण शहरातही या आजाराचा रुग्ण आढळला आहे. खडकपाडा परिसरात राहणा-या एका ४९ वर्षीय महिलेला याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
संबंधित रुग्ण महिला २५ जानेवारीला कानपूर येथे एका लग्न समारंभासाठी गेली होती. तेथून ती जयपूरला गेली. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ४ फेब्रुवारीला कल्याणला परतली. दरम्यान, ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने तिने खासगी डॉक्टरांकडून औषध घेतले परंतु, तब्येतीत काहीच फरक न पडल्याने ९ फेब्रुवारीला तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील तपासणीत तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर मस्के यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे कल्याणमधीलच एका महिलेचा स्वाइन फ्लूने पंजाबमधील पटियालामध्ये काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे.