महिलेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा
By Admin | Updated: September 7, 2015 01:21 IST2015-09-07T01:21:59+5:302015-09-07T01:21:59+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात रविवारी एका महिलेने त्यांच्या वाहनांचा ताफा अडविला, मात्र घटनास्थळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी येताच ते गाडीतून उतरले आणि त्यांनी महिलेची व्यथा समजून घेतली

महिलेने अडविला मुख्यमंत्र्यांचा ताफा
सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात रविवारी एका महिलेने त्यांच्या वाहनांचा ताफा अडविला, मात्र घटनास्थळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी येताच ते गाडीतून उतरले आणि त्यांनी महिलेची व्यथा समजून घेतली.
साडेचार वाजता मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होता़ पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ताफा येताच भारती कोळी एका गाडीसमोर आल्या, चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्या वाचल्या. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली़ पोलिसांनी त्यांना बाजूला केले. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे आली़ मुख्यमंत्री तेथेच उतरले़ त्यांनी कोळी यांच्याशी संवाद साधला.
२००९ मध्ये महादेव कोळी जमातीच्या जातीचा दाखला अवैध ठरविल्यामुळे शिक्षिकेची नोकरी गेल्याचे कोळी यांनी सांगितले. त्यावर महादेव कोळी समाजाकडे जातीचा दाखला नसल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत़ त्यांना सेवेत घेण्याबाबत विचार करु़ सध्या जे नोकरीला आहेत त्यांच्या दाखल्याबाबत कोणताही निर्णय न घेता स्थगिती द्यावी, असा आदेश दिला असल्याचे फडणवीस यांनी त्यांना सांगितले. (प्रतिनिधी)
दुष्काळाचा आढावा
मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घेतला. अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून त्यांनी टंचाईची माहिती घेतली.
दुष्काळ पचविण्याची
शक्ती द्यावी
अमृत पिण्यासाठी सर्वजन पुढे येतात़ पण भगवान शंकराने समाजाला विषमुक्त करण्यासाठी विष पचविले होते़ आता आमच्यावर दुष्काळाचे संकट आले आहे़ ते संकट दूर करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला शक्ती द्यावी, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर डॉ़ सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ७९ व्या श्रावणमास तपोनुष्ठान मौनमुक्तीच्या सांगता सोहळ्यास ते प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.