भुशी डॅमवर तरुणीची छेड; चौघांना अटक
By Admin | Updated: July 14, 2017 04:53 IST2017-07-14T04:53:39+5:302017-07-14T04:53:39+5:30
ठाणे येथील एका कुटुंबातील तरुणीची छेड काढीत चार तरुणांनी अपशब्द वापरून त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली

भुशी डॅमवर तरुणीची छेड; चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा (पुणे) : वर्षाविहारासाठी भुशी डॅमवर आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबातील तरुणीची छेड काढीत चार तरुणांनी अपशब्द वापरून त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी चार तरुणांना अटक केली आहे.
सचिन तुकाराम शिंदे (वय २२), शरद सखाराम शिंदे (२८, दोघेही रा. आंबोली, ता. खेड), महेश अंकुश शिंदे (वय २४, रा. पुणे) आणि गणेश गणपत साबळे (वय २५, रा. साबळेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी मुलगी नालासोपारा, ठाणे येथील आहे. हे कुटुंब भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसले असताना या तरुणांनी फिर्यादीसह तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या अंगावर पाणी उडविण्यास सुरुवात केली. याबाबत फिर्यादी तरुणीने विचारणा केली असता, त्यापैकी एकाने लज्जा उत्पन्न करणारे वक्तव्य केले.