‘जॅक्सन वधा’चा साक्षीदार ‘विजयानंद’वर हातोडा!
By Admin | Updated: October 13, 2015 02:56 IST2015-10-13T02:56:14+5:302015-10-13T02:56:14+5:30
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणजे येथील कान्हेरे बंधूंनी तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॅक्सन याचा विजयानंद थिएटरमध्ये केलेला वध.

‘जॅक्सन वधा’चा साक्षीदार ‘विजयानंद’वर हातोडा!
संजय पाठक, नाशिक
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणजे येथील कान्हेरे बंधूंनी तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॅक्सन याचा विजयानंद थिएटरमध्ये केलेला वध. विजयानंदचे अस्तित्व कायम राहावे, ही चित्रपटगृह मालकाच्या चौथ्या पिढीची तळमळ आहे. मात्र, पोलिसी कार्यवाहीमुळे इतिहासातील हे पान गळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पारतंत्र्यात विजयानंद एक नाट्यगृह होते आणि येथेच २१ डिसेंबर १९०९ रोजी ‘संगीत सौभद्र’ पाहण्यासाठी गेलेल्या जॅॅक्सनचा कान्हेरे बंधूनी गोळ्या घालून खून केला. त्यामुळे ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. कान्हेरे बंधू व विजयानंदचे नाव इतिहासात कायमचे लिहिले गेले.
१९०६मध्ये शंकरशेट चुंबळे यांनी विजयानंदची उभारणी केली. प्रारंभी येथे कळसूत्री बाहुल्यांचे खेळ होत असत. कालांतराने नाटके सादर होऊ लागली. १९५०मध्ये विजयानंद नाट्यगृहाचे चित्रपटगृहात रूपांतर झाले. सुरुवातीला हिंदी-मराठी आणि नंतर केवळ मराठी चित्रपटांसाठी विजयानंद हक्काचे घर बनले.
आता केवळ चित्रपटगृह चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करताना वारसाला तसा अधिकार देता येणार नाही, अशी तांत्रिक सबब पुढे करून सहा महिन्यांपूर्वी परवाना रद्द करण्यात आला आणि आता तर प्रशासनाने पोलिसांकरवी चित्रपटगृहच बंद केल्याची तक्रार विद्यमान संचालक विनय चुंबळे यांनी केली आहे.
चित्रपटगृहाचा परवाना आधी त्यांचे आजोबा वसंतराव चुंबळे यांच्या नावावर होता. २००७मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याऐवजी आपले नाव लावून परवाना नूतनीकरण करावे, यासाठी विनय यांनी रीतसर अर्ज दिला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अचानक सहा महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांनी ‘विजयानंद’ व त्यालगतच्या ‘दामोदर’चादेखील परवाना रद्द झाल्याने ते बंद करण्याचे आदेश बजावले.