तुमच्या परवानगीशिवाय एकही इंच जमीन घेणार नाही

By Admin | Updated: October 8, 2014 23:08 IST2014-10-08T22:06:45+5:302014-10-08T23:08:39+5:30

उद्धव ठाकरे : राज्यात शिवशाही अवतरणार असल्याचे केले सूतोवाच

Without taking your permission, you will not take any inch of land | तुमच्या परवानगीशिवाय एकही इंच जमीन घेणार नाही

तुमच्या परवानगीशिवाय एकही इंच जमीन घेणार नाही

मालवण : पानाची टपरी असो वा चहाचा गाडा असो, यात निरूद्योग मंत्र्याची पार्टनरशीप आली. कोकणी माणसाच्या उरावर बसून कोकणच्या विकासाच्या पोकळ गप्पा मारण्याचे काम सुरू आहे. आता आई तुळजाभवानीच्या कृपेने महाराष्ट्रात शिवशाही अवतारणार आहे. त्यावेळी येथे कोण गुंडागर्दी करतो ते मी पाहतो. एक इंचही जमीन तुमच्या परवानगीशिवाय घेणार नाही आणि जे कोण घेतील त्यांना तुरूंगात डांबीन. माझ्या शिवशाहीत लोकांना आनंदी करेन. माझे सरकार हे तुमचेच सरकार असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालवण येथे आयोजित जाहीर सभेत केले.
शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा टोपीवाला हायस्कूलच्या भव्य पटांगणावर झाली. यावेळी ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी, नारायण राणे यांची थेट नावे न घेता टीका केली.
महिषासुराचा राजकीय वध करा
कोकणात आल्यानंतर मला घरात आल्यासारखे वाटते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भगवा आणि कोकण हे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांपासून सत्ता केंद्रातील सर्व पदे प्रथम कोकणी माणसाला दिली. यातूनच कोकणची पूर्ण जबाबदारी दिलेली व्यक्ती आपल्याच माणसाला खायला निघाली. यामुळे कोकणी माणसाची आणि शिवसेनेची जोडलेली नाळ तोडण्याचे काम या व्यक्तीने केले. मात्र शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम दाखवून दिले आहे. आता या महिषासुराचा कायमस्वरूपी राजकीय वध करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
शिवरायांचे तेज जगाला दाखवा
युती कायम रहावी ही आमची शेवटपर्यंतची इच्छा होती. २५ वर्षांची मैत्री अधिक घट्ट व्हावी म्हणून माझ्या हातात होते तेवढे मी केले. मात्र दिल्लीतील कोणा एका नेत्याने युतीत बिघाडी केली. आई तुळजाभवानीच्या दारातच हा युती तुटल्याचा मेसेज मिळाला. आईचीच कृपा असेल तर महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल.
शिवरायांचे तेज आणि भगव्याची शान अख्ख्या जगाला दाखवून देण्याची संधी शिवसैनिकांना मिळाली आहे. माझ्यासमोर जमलेल्या शिवसेनेच्या वारूळावर पाय ठेवण्याची हिंमत कोण करेल काय? भगव्याची सत्ता महाराष्ट्रात येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
सिंधुदुर्गच्या प्रश्नांना हात
चिपी विमानतळ, तोंडवळी सी-वर्ल्ड, मच्छिमारांचे प्रश्न, सीआरझेड, मायनिंग, गौणखनिज या विषयांना हात घालत सिंधुदुर्गच्या विकासासाठी जनतेच्या इच्छेशिवाय एकही इंच जमीन घेणार नाही किंवा घेऊ देणार नाही.
सिंधुदुर्गच्या प्रश्नासाठी वैभव नाईक ढाण्या वाघाप्रमाणे लढत आहे. माझ्या एका वाघासमोर शेळपट काँग्रेसची मंडळी लपून बसत आहेत. कोकणच्या विकासासाठी लोकांतून येणाऱ्या सूचनांमधून विकासाची डॉक्युमेंटरी तयार केली जाईल, असे अभिवचन उद्धव ठाकरे यांनी दिले.
राणेंच्या भावनिक आवाहनाला जनता भीक घालणार नाही. माझी शेवटची निवडणूक सांगत फिरणाऱ्यांना जनताच आम्हीच ठरवली तुमची शेवटी निवडणूक आहे, असे सांगतील.
मतदारांनी मुंबईच्या पार्सलला माघारी पाठविण्याचे निश्चित केले आहे. गुंडगिरी, दहशत आता संपवून विकासाचे वैभव स्विकारण्यासाठी मतदार उत्सुक आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
भराडी मातेला साकडे
मुंबई महानगरपालिका, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरभरून यश मिळण्यासाठी आंगणेवाडी येथील भराडी मातेला साकडे घातले होते. त्याची नवसफेड शिवसैनिकांनी त्याच उत्साहाने केली होती. आता पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्याचे साकडे उपस्थित शिवसैनिकांना साक्षी ठेऊन यावेळी उद्धव ठाकरे यांनी घातले. यावेळी शिवसैनिकांमधून आई जगदंबा आणि भराडी मातेचा जयघोष करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Without taking your permission, you will not take any inch of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.