रस्त्याअभावी ऊस गाळपाविना शेतातच
By Admin | Updated: March 6, 2017 01:32 IST2017-03-06T01:32:28+5:302017-03-06T01:32:28+5:30
मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे.

रस्त्याअभावी ऊस गाळपाविना शेतातच
सोमेश्वरनगर : मुरूम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती हद्दीमधील सुमारे ४० एकर क्षेत्रातील ऊस रस्ताच नसल्याने गाळपाअभावी शेतातच उभा आहे. याबाबत रस्त्याचा वाद मिटविण्याबाबत ग्रामस्थ हतबल झाल्यामुळे अखेर हा वाद तहसीलदारांकडे गेला आहे.मात्र, याबाबत अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
मुरूम (ता. बारामती) गावच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसोबावस्ती या ठिकाणी सुमारे अडीचशे एकर क्षेत्र आहे. यातील जवळपास २५ शेतकऱ्यांचा ४० एकर ऊस आहे. मात्र, हा रस्ता अडविला गेल्याने ४० एकर क्षेत्रातील ऊस शेतातच वाळून चालला आहे. तर दुसरीकडे सोमेश्वर कारखाना अजून केवळ दोन दिवस सुरू असल्याने रस्त्याचा वाद लवकरात लवकर मिटणे आवश्यक आहे. कारखाना बंद झाल्यास या शेतकऱ्यांना माळेगाव कारखान्याला ऊस घातल्याशिवाय पर्याय नाही. या ४० एकर क्षेत्रातील १५ एकर ऊस जळाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाला चांगला दर असून ४० एकरातील जवळपास दीड हजार टन रस्त्याअभावी शेतातच उभा आहे. जर रस्त्याचा वाद मिटला नाही तर या २५ शेतकऱ्यांचे जवळपास ५० लाख रुपयांच्या आसपास नुकसान होणार आहे.
गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी अडविलेल्या रस्त्याबाबत अनेक वेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आले. यानंतर याबाबत बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली.
त्यानंतर तहसीलदार हनुमंत पाटील हे घटनास्थळी भेट देऊन ज्यांनी रस्ता अडविला आहे. त्यांनर रस्ता मोकळा करून द्यावा, असे सांगून पिकाचे नुकसान होऊ देऊ नका अशी विनंती केली. मात्र कालही रस्ता वाहतुकीस खुला न झाल्याने आज या २५ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले. (वार्ताहर)
>हा रस्ता कुठे गायब होतो...
सोमेश्वर कारखाना १९६५मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून मुरूम गावातील म्हसोबावस्ती याठिकाणी अडीचशे एकर क्षेत्राचा रस्ता सुरू होता. कारखाना स्थापनेपासून याच रस्त्याने सोमेश्वर कारखान्याला ऊस घातला गेला आहे.
मग आत्ताच अचानक हा रस्ता कुठे गायब होतो, असा सवाल मुरूम ग्रामस्थांनी केला आहे.