आप्तेष्टांवर वार करून सिंहासन जिंकलेच पाहिजे!
By Admin | Updated: September 26, 2014 13:23 IST2014-09-26T13:23:08+5:302014-09-26T13:23:08+5:30
महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले.

आप्तेष्टांवर वार करून सिंहासन जिंकलेच पाहिजे!
होऊ दे चर्चा...
(स्थळ : मातोश्री महाल. २८८ इंचांच्या आलिशान राजमंचकावर महाराज लोळत पडलेले.)
मिलिंद : (कुर्निसात करत) महाऽऽराज.. मोहीम फत्ते जाहली. आपल्याला हवे तसे सारे जुळून आले. वाटेतले काटे दूर झाले. गनिम स्वत:हून बाजूला सरकले.
उद्धोराजे : (खूश होत) आता ताबडतोब ‘सिंहासनावर कसं बसावं?’ हे पुस्तक आणून द्या. एक महिना वेळ आहे. तोपर्यंत त्याचा अभ्यास करतो.
आदिराजे : (हळूच) मग मलाही ‘उपसिंहासनावर बसण्याचा फॉर्म्युला’ हे पुस्तक आणून द्या नां मिलिंद अंकल.
उद्धोराजे : आता माझा मोबाईल चालू करा. त्या ‘देव-विनोद’ जोडीनं गेले पंधरा दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ फोन करून डोकं उठवलं होतं माझं.
मिलिंद : पण, तुम्ही त्यांचा कॉल घेतलाच कधी? रोजची चर्चा तर मी अन् संजयरावच करत होतो.
उद्धोराजे : आजचा दिवस मला तुमच्यामुळंच पाहायला मिळाला. महाभारतातला ‘संजय’ म्हणे फक्त युद्धाची वर्णनं करत होता; पण माझ्या ‘संजय’नं तर आधुनिक महाभारत घडवलं.
मिलिंद : (विनयानं) त्यात आमचा काय रोल महाराज? तुम्ही जेवढं सांगत गेलात, तेवढंच आम्ही करत गेलो. छानपैकी मोडत गेलो.
आदिराजे : पण, काय हो अंकल... माझे आजोबा तर मला लहानपणी सांगायचे की, ‘जोडायला खूप कष्ट लागतात, मोडायला एक क्षणही लागत नाही.’
उद्धोराजे : (चपापत) गप्प बसा बाळराजे. अजून तुम्ही लहान आहात. दिल्लीश्वरांचं राजकारण समजायला तुम्हाला अजून बराच अवधी आहे.
मिलिंद : मग आता पुढच्या तयारीला लागावं म्हणतोय महाराज.
उद्धोराजे : लागा नां. लागा. आमच्या सिंहासन स्थानापन्नतेचा मुहूर्त शोधा. राज्यात सर्वत्र दवंडी पिटवा की ‘अखेर आम्ही सर्वेसर्वा जाहलो!’
मिलिंद : (डोकं खाजवत) पण महाराज अजून युद्ध व्हायचंय. त्यात आपल्याला जिंकायचंय. त्यानंतर मग....
आदिराजे : (दचकून) म्हणजे आज जे काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, ते राज्य करण्याचं नव्हे तर?
मिलिंद : होय महाराज. आपल्याला अगोदर स्वत:ची फौज तयार करावी लागणार. त्यानंतर रणांगणात दुष्मनांसोबतच आपल्याच बंधूंवर वार करावे लागणार. वेळप्रसंगी त्यांचा खातमाही होणार!
उद्धोराजे : (वास्तवाची जाणीव होताच) खामोश. आम्ही तुम्हाला फक्त एवढाच आदेश दिला होता की, ‘आम्हाला सिंहासन पाहिजे.’ याचा अर्थ आम्हाला महाभारतातला अर्जून बनायचं नव्हतं. मी माझ्याच बंधूंवर शस्त्रं उगारू? कदापिही शक्य नाही. ताबडतोब तो निर्णय बदला. आमच्या ‘रामभाऊ, राजूअण्णा अन् म्हादबा’ या तीन शूर सरदारांना बोलवा.
मिलिंद : ती वेळ केव्हाच निघून गेली महाराज... आपले जवळचे हे सरदारही केव्हाच फितूर जाहले.
- सचिन जवळकोटे