नव्या कलाकारांच्या अद्भुत स्वरांनी रसिकांना जिंकले
By Admin | Updated: January 4, 2015 00:51 IST2015-01-04T00:51:58+5:302015-01-04T00:51:58+5:30
भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील दिग्गजांसह नवीन कलाकारांच्या आविष्कारांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा तिसरा दिवस गाजला.

नव्या कलाकारांच्या अद्भुत स्वरांनी रसिकांना जिंकले
पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील दिग्गजांसह नवीन कलाकारांच्या आविष्कारांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा तिसरा दिवस गाजला. प्रथमच महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळालेल्या रमाकांत गायकवाड, श्रीवाणी जडे यांच्या अद्भुत स्वरांनी रसिकांना जिंकले..... बहाउद्दिन डागर यांच्या रूद्रवीणेने रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या, तर मालिनी राजूरकर यांच्या भावोत्कट आणि शास्त्रशुद्ध गायकीने रसिकांना आनंदाची परमोच्च अनुभूती दिली. अभिजात कलाविष्कारांच्या सुरेल झंकारांनी महोत्सवाच्या मैफलींना शनिवारी स्वरमयी साज चढला.
प्रतिभावान गायकीचा प्रत्यय
युवा गायक रमाकांत गायकवाड यांच्या दमदार गायनाने महोत्सवाच्या पहिल्या सत्रास सुरुवात झाली. कोमल स्वरांनी बहरलेल्या भीमपलास रागातील ‘अब तो परस’ आणि लागे मोरी चुनरी या बंदिशींच्या सादरीकरणातून आपल्या प्रतिभावान गायकीचा प्रत्यय त्यांनी रसिकांना दिला. स्वरांवरील जबरदस्त पकड आणि भावपूर्ण आलापीमधून रागाचे सौंदर्य त्यांनी खुलविले. ‘याद पिया की आए’ या त्यांच्या ठुमरीने रसिकांना वेड लावले. समाप्तीनंतरही टाळ्यांचा कडकडाट आणि वन्स मोअरचा जयघोष मंडपात गुंजत होता. त्यांच्या स्वरांमध्ये हरवून जाण्यासाठी रसिक आसुसलेले होते. मात्र, वेळेच्या मर्यादेमुळे गाणे आवरते घ्यावे लागल्यामुळे रसिकांची काहीशी निराशा झाली. तबल्यावर त्यांना पांडुरंग पवार, हार्मोनिअमवर सिद्धेश विचोलकर, तानपुऱ्यावर गायत्री गायकवाड आणि कल्याण शिंदे यांनी साथसंगत केली.
आश्वासक गायकीचा अनुभव
गायकवाड यांच्या गायनाची अतृप्त आस श्रीवाणी जडे यांच्या आश्वासक गायकीने भरून काढली. वडील भवानी प्रसाद जडे आणि काका राघवेंद्र तिलवारी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्राथमिक आणि पं. परमेश्वर हेगडे यांच्याकडून किराणा घराण्याच्या गायकीचे सूर अवगत करणाऱ्या श्रीवाणी जडे यांच्या स्वरांनी महोत्सवात रंग भरले. पूरिया धनश्री रागातील ‘आज सुमंगल’ आणि घन घन तेरो’ या रचना त्यांनी सादर केल्या. ‘माँ गिरीधर माका ना चाही’ या राजस्थानी भजनाने सुरेल अनुभूती दिली. हार्मोनिअमवर त्यांना सुयोग कुंडलकर, तबल्यावर प्रशांत पांडव, तर तानपुऱ्यावर वैष्णवी अवधानी व अपर्णा सुरवसे यांनी संगत केली.
वत्सलाबाई जोशी पुरस्कार
४ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांच्या हस्ते आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
निरंतर साधना करीत राहीन
४वत्सलाबार्इंच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. दर्दी रसिकांच्या साक्षीने या पुरस्काराचा आनंद अधिक द्विगुणित झाला आहे. १९८३मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायले तेव्हापासून माझा सांगीतिक प्रवास वत्सलाबार्इंनी पाहिला आहे. यापुढेही संगीताची निरंतर साधना करीत राहीन, असे मी वचन देते, अशी भावना आरती अंकलीकर यांनी या वेळी व्यक्त केली.
रुद्रवीणेचे जादुई स्वर
सतारवादन, सूरबहार आणि रुद्रवीणा या तंतुवाद्यांवर उत्तम प्रभुत्व असलेल्या बहाउद्दिन डागर यांच्या रुद्रवीणा वादनातील अभिजातता रसिकांनी अनुभवली. आलाप, जोड झाला या वादनप्रकारात मंद्र ते तार सप्तकापर्यंत लिलया फिरणाऱ्या त्यांच्या जादुई सुरांनी तृप्तीची अनुभूती दिली. पटदीप रागामध्ये चौतालाची गत तब्बल एक तास त्यांनी वाजविली. मात्र, त्या वाद्याचा आवाका आणि मर्यादा पाहता त्यांनी रसिकांची रजा घेतली.
नाराजीचा सूर
४श्रीनिवास जोशी यांच्या गायनाला अधिक कालावधी आणि नव्या पिढीचे गायक रमाकांत गायकवाड यांच्या गायनाला वेळेच्या मर्यादेचे दिलेले कारण याबद्दल रसिकांनी नाराजीचे सूर प्रकट केले.
४गायकवाड यांना पंधरा मिनिटे वाढवून देण्यास हरकत नव्हती. शुक्रवारी पंडितजींचे शिष्य आनंद भाटे यांना रसिकांच्या आग्रहाखातर वेळ वाढवून देण्यात आला होता; पण गायकवाड यांच्यासाठी ‘वन्स मोअर’ची मागणी करूनही ती वेळेच्या सबबीखाली फेटाळण्यात आली.
उत्तरार्ध ठरला रंगतदार
४महोत्सवाचा उत्तरार्ध ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांच्या गायकीने अधिकच रंगतदार ठरला.
४दर वर्षी महोत्सवातील त्यांची उपस्थिती रसिकांना सुखावून जाते. केवळ त्यांचे सूर कानात साठवून ठेवण्यासाठी रसिकांची त्यांच्या मैफलीला अलोट गर्दी होते. टप्पा गायकीवर असलेले त्यांचे प्रभुत्व आणि भावोत्कट रागाचे सादरीकरण या वैशिष्ट्यांसाठी रसिक त्यांच्या मैफलीला आवर्जून हजेरी लावतात.
४कालही त्याचाच प्रत्यय आला. बागेश्री अंगाने जाणाऱ्या चंद्रकंस रागाने त्यांनी मैफलीस प्रारंभ केला. आलापींच्या विविध हरकतींमधून त्यांनी ‘तुम बिन नाही कोई दूजा जगमें’ ही बंदिश त्यांनी खुलवली. हार्मोनिअमवर त्यांना अरविंद थत्ते यांनी, तर तबल्यावर भरत कामत त्यांनी साथसंगत केली. त्यांच्या अद्वितीय स्वरांनी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीची सांगत झाली.
अभंगांनी खिळवून ठेवले
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व चिरंजीव श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. शुद्ध ख्याल, ठुमरी आणि भक्तिसंगीतामध्ये हातखंडा असलेल्या जोशी यांनी मारूबिहाग रागापासून गायनास प्रारंभ केला. विलंबित एकतालातील ‘परि मोरे नाव’ आणि दृत लयीतील ‘तरपत रैनदिन’ या बंदिशी त्यांनी सादर केल्या. अब्दुल करीम खाँ यांची ‘छब दिखलाजा’ ही ठुमरी आणि ‘बाजे रे मुरलिया बाजे’ हे भजन त्यांनी सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. हार्मोनिअमवर त्यांना अविनाश दिघे, तबल्यावर प्रशांत पांडव, सारंगीवर फारूख लतीफखाँ, तर तानपुऱ्यावर मुकुंद बाद्रायणी आणि नामदेव शिंदे यांनी साथसंगत केली.
अकुशल कर्मचाऱ्यांच्या प्रगतीला महत्त्व द्या : नारायणन
पुणे : कौशल्याधारित शिक्षण घेऊन व्यवस्थापन क्षेत्रात आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबरील इतर अकुशल कर्मचाऱ्यांच्या प्रगतीला तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील हॉर्वर्ड स्कूल आॅफ बिझनेसचे प्रा. व्ही. जी. नारायणन यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल आॅफ बिझनेसच्या तिसाव्या तुकडीच्या पदवीप्रदान सोहळ्यात नारायणन बोलत होते. कार्यक्रमास माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, व्याख्याते मोहन पालेशा, स्कूल आॅफ बिझनेसचे संचालक (ग्रुप कॅप्टन) दीपक आपटे, मनदीप टाक, सहयोगी संचालक डॉ. अमित सिन्हा उपस्थित होते. नारायणन म्हणाले, पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन व्यवसायात पदार्पण करणे ही आयुष्यातील महत्त्वाची पायरी असते. नावीन्याचा स्वीकार, सहकाऱ्यांशी सलोखा, नेतृत्व करण्याची तयारी प्रत्येकात असायला हवी. आजच्या तरुणाईने बदलांना स्वीकारत व्यवसाय वृद्धिंगत केला, तर पुढील काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था अधिक भक्कम होईल.