मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळात लवकरच १७ हजार ४५० चालक आणि सहायकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल. भरती झालेल्यांना त्यांना ३० हजार रुपये इतके किमान वेतन मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बससेवा सुरळीत ठेवण्यासंदर्भात आवश्यक असलेले चालक व सहायक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्षे कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार ३० हजार किमान वेतनही प्रक्रिया ६ प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. या कर्मचाऱ्यांना ३० हजार इतके किमान वेतन देण्यात येणार असून, त्यांना एसटीकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.बसेसची वाढती संख्या व त्यासाठी हवे असणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.