मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढणार की युती करून लढणार यावरून महायुतीत एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाने एकत्र लढवल्या होत्या. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती एकत्रित लढवेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेला सध्या तरी अजित पवार गटाकडून छेद देण्यात आला आहे.
अजित पवार गटाचे दोन दिवसांचे शिबिर शनिवारी शिर्डी येथे सुरू झाले. हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, सामंजस्याची भूमिका घेत आम्ही आगामी निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.वळसे-पाटील म्हणाले की, शिर्डी शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीती ठरवणार आहोत. निवडणुकीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि कसे लढायचे, याबाबत निर्णय होईल; पण जर युती झाली तर ठीक अन्यथा अजित पवार गट स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एकाधिकारशाही; भुजबळांचा हल्लाशिर्डी : शिबिरात आलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नामोल्लेख टाळत थेट पक्षनेतृत्वावर टीकास्त्र सोडले. पक्षात एकाधिकारशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. नाव घेतले नसले तरी त्यांच्या टीकेचा रोख अजित पवार यांच्याकडे होता. भुजबळ म्हणाले, आमच्या पक्षात कुणाचाच विचार घेतला जात नाही. आता तर काय शिबिराला अजितपर्व नाव दिले. त्यामुळे प्रश्नच संपला. मधल्या संघर्षात भूमिका घेतली त्याचे प्रायश्चित्त मला मिळाले. मी आलो तरी सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या, असे नाही. राज्यसभेवर जाण्याचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे नाही, असेही भुजबळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्यात याव्यात अशी भावना शनिवारी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिबिरात व्यक्त केली. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते यावर एकत्र बसून निर्णय घेतील.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट
अजित पवार गटाने स्वबळाचा नारा दिला असला तरी आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. स्थानिक युनिट म्हणूनच आम्ही विचार करू. वळसे-पाटील यांनी काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. जेथे शक्य असेल तेथे आम्ही महायुती म्हणून सामोरे जाऊ.- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री