Uddhav Thackeray News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यातच मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. राज्यात या घडामोडी सुरू असताना दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होत आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राज्यासह राष्ट्रीय पातळीवरही उत्सुकता लागून राहिली आहे. राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालीच तर महाविकास आघाडी टिकणार की फुटणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. ०७ ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक असून, उद्धव ठाकरे यासाठी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची परीक्षा
आम्ही भाऊ २० वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता ? असा सवाल राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केला. राज आणि उद्धव यांच्यातील दरी कमी होत असल्याचा आणखी एक संकेत मिळाला. उद्धव ठाकरे ६ ते ८ ऑगस्ट दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ७ ऑगस्टला राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीत राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा झालीच तर काँग्रेस आणि अन्य पक्षांची मनसेला सोबत घेण्याबाबत काय भूमिका असेल? ही युती सहज स्वीकारतील? वेळ आलीच तर उद्धव हे राज यांच्यासाठी आघाडीवर 'पाणी सोडण्याची' तयारी दाखवतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
दरम्यान, कुणासोबत पटत नाही, आवडत नाही असे चालणार नाही. २० वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत; पण तुम्ही एकमेकांशी का भांडता? तुम्ही एकत्र कधी येणार? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धवसेनेच्या युतीबाबत प्रथमच भाष्य केले. महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदार याद्या व दुबार मतदानावर विशेष लक्ष केंद्रित करा. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे. युतीसंदर्भातील निर्णय घेऊन त्याबद्दल योग्य वेळी बोलेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.