पावसाळी शेडची दुकानदारी थांबणार?

By Admin | Updated: June 30, 2016 02:38 IST2016-06-30T02:38:35+5:302016-06-30T02:38:35+5:30

पक्के बांधकाम करून त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याची दुकानदारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केली

Will stop shopping for the rainy shed? | पावसाळी शेडची दुकानदारी थांबणार?

पावसाळी शेडची दुकानदारी थांबणार?

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पावसाळी शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याची दुकानदारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केली आहे. पालिकेची दिशाभूल करून लाखो रुपये कमविण्याचा मार्ग बंद झाला असून, पोटभाडेकरूही गायब झाले आहेत. विनासायास पैसे मिळविण्याचा स्रोत थांबल्याने दुखावलेल्या व्यापाऱ्यांनी आता प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
व्यापाऱ्यांचे पावसामुळे नुकसान होवू नये यासाठी पावसाळी शेड उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण पालिकेने निश्चित केले होते. या शेडचा कोणताही व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु हॉटेल व इतर व्यावसायिकांनी या शेडच्या नावाखाली सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून लाखो रुपये कमविण्यास सुरवात केली. हॉटेलच्या समोर व इतर बाजूला मोकळी जागा असल्यास तेथे पक्के शेड उभारण्यात येते. अनेक हॉटेलमध्ये अधिकृत जागेपेक्षा बाहेरील शेडमध्ये अधिक ग्राहक बसतील अशी रचना करण्यात आली आहे. शेडची मुदत संपली तरी ते हटविले जात नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेकांनी कायमस्वरूपी अतिक्रमण करून ठेवले होते. प्रत्येक हॉटेलचालकाने त्याच्या दुकानाच्या बाहेर पानटपरी तयार करून ती भाडेतत्त्वावर दिली आहे.
>पावसाळी शेडचे वास्तव
पावसाचे पाणी दुकानात येवू नये यासाठी पालिका प्रत्येक वर्षी पावसाळी शेडला परवानगी देते. परंतु या जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु हॉटेल व इतर व्यावसायिक पक्के शेड तयार करून त्यामधून महिन्याला हजारो रुपये कमवितात. पानटपरी, पाणीपुरी, भाजी व फळ विक्रीसह इतरांना सार्वजनिक वापराची जागा भाडेतत्त्वावर दिली जात आहे. महापालिकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध वापर केला जात असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
>दबावतंत्राचा वापर
आयुक्तांच्या भूमिकेमुळे विनासायास होणारी कमाई थांबल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. पावसाळी शेडला व पर्यायाने सार्वजनिक वापराच्या जागेचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी महासभेच्या अधिकारावर घाला घातला जात असल्याची टीका सुरू झाली आहे. प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असून आयुक्त त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
अनेक व्यावसायिकांनी दुकानासमोरील जागा भाड्याने देवून महिन्याला २५ ते ५० हजार रुपये भाडे वसूल करण्यास सुरवात केली होती.पालिका आयुक्तांच्या कारवाईमुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली ही दुकानदारी बंद झाली आहे. मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू आहे.
व्यापाऱ्यांनी पावसाळा शेडला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. परंतु कोणालाही शेडसाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Will stop shopping for the rainy shed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.