शिवसेना-मनसे युती होणार? बाळा नांदगावकर मातोश्रीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 20:49 IST2017-01-29T19:52:27+5:302017-01-29T20:49:02+5:30
शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटल्यानंतर आता मुंबईत नवी राजकीय समीकरणे उदयास येत आहेत.

शिवसेना-मनसे युती होणार? बाळा नांदगावकर मातोश्रीवर!
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटल्यानंतर आता मुंबईत नवी राजकीय समीकरणे उदयास येत आहेत. आज संध्याकाळी राज ठाकरे यांचा युतीचा प्रस्ताव घेऊन मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाबाबत अनुकूलता दर्शवल्यास मुंबईत शिवसेना आणि मनसे यांच्यात पालिका निवडणुकीपूर्व युती होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची भाजपाशी युती तुटल्यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आज संध्याकाळी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्यावतीने युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे. राज ठाकरे युतीसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या भेटीत बाळा नांदगावकर यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकली नाही, पण अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे आदी नेत्यांशी त्यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.